नानगाव : कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने दौंड तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. उत्पादन खर्चदेखील परत न मिळाल्याने शेतकर्यांच्या डोळ्यांत अश्रू तर वखारीत खराब होत असलेला कांदा पाहून हवालदिलपणा दिसून येत आहे. ‘इकडे आड तर तिकडे विहीर’ अशी कांदा उत्पादक शेतकर्यांची स्थिती झाली आहे. (Pune latest News)
दरवर्षीप्रमाणे यंदाही दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झाली. यामध्ये काही नवीन शेतकर्यांनीही चांगले उत्पन्न घेतले. मात्र एप्रिलमधील प्रखर उष्णता आणि मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे कांदा साठवणुकीत गंभीर अडचणी निर्माण झाल्या. पावसामुळे वाळवणात ठेवलेला कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकर्यांनी वखारीत साठवणूक केली. पण, हवामानातील बदलामुळे आर्द्रता निर्माण होऊन कांदा सडण्यास सुरुवात झाली.
अनेक शेतकर्यांनी या वर्षी लाखो रुपये खर्च करून नव्या वखारी उभारल्या, परंतु त्या वखारीतच कांदा खराब होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे गडगडलेले बाजारभाव, तर दुसरीकडे सडणारा कांदा-अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
शेतकरी सांगतात, ’तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेले कांद्याचे पीक आमच्या डोळ्यांसमोर सडत आहे आणि बाजारात त्याला भावही मिळत नाही. उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.’
कांदा खराब होत असल्याने शेतकरी लाखो रुपये खर्चून उभारलेल्या वखारीकडे हताशपणे पाहात आहेत. कांद्याला भाव नाही, उत्पादन खर्च निघत नाही, मग या वखारींचा खर्च कधी निघणार, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा आहे.