

Unauthorized Pune MPSC tution Class
पुणे: स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी कोचिंग क्लासचालक प्रोत्साहन देत आहेत का? त्यांनी विविध परवानग्या घेताना सर्व अटी, शर्तींचे पालन केले आहे का? याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. तसे आढळल्यास नियमबाह्य कोचिंग क्लासविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.
प्रामुख्याने दोन ते तीन महिने परीक्षा लांबणीवर पडल्यास खासगी क्लासचालकांसाठी आर्थिक फायद्याचे असल्यानेही अशा आंदोलनांना खतपाणी घातले जात असल्याची चर्चा आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या हजारो विद्यार्थ्यांना कोचिंग क्लास चालकांकडून धडे दिले जातात.
प्रत्यक्षात मात्र, स्वतःच्या आर्थिंक फायद्यासाठी बहुतांश क्लास चालकांकडून चक्क विद्यार्थ्यांनाच आंदोलन करण्यासाठी पुढे केले जात आहे असल्याची पोलिसांची माहिती आहे. परीक्षा पुढे ढकला, एमपीएससी, यूपीएससी आयोगाच्या विविध धोरणात्मक निर्णयाबाबत टीका करण्यास भाग पाडले जात आहे.
त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांकडून वारंवार आंदोलन करत नागरिकांसह पोलिसांना वेठीस धरले जात आहे. त्याबरोबरच स्पर्धा परीक्षेशी काही संबंध नसताना देखील काही जण आंदोलन भडकवत आहे. त्यामुळे आंदोलन भडकवणारेही यानिमित्ताने रडारवर आले आहेत.
पुण्यातील काही स्पर्धा परीक्षा क्लास चालकांकडून विविध नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा करणार्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता न घेणे, अग्निशमक दल, महापालिका, स्थानिक पोलिसांची परवानगी नसणे, यासह विविध परवानगीची तपासणी मोहीम आम्ही सुरू केली आहे. नियमबाह्य क्लासचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर