

Mumbai Local Impact On Health
मुंबई : मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली लोकलच त्यांच्या आजारांचे कारण बनत चालली असून, लोकलचा तासनतास प्रवास, गर्दीच्यावेळी सतत उभे राहणे आणि नीट उभे राहणेही शक्य नसल्याने कधी विचित्र टेकून उभे राहात प्रवास करावा लागतो. याचा परिणाम मुंबईकरांच्या शरीराची ठेवणच बदलण्यात दिसू लागली आहे. मानेची, हाताची ठेवण बदलण्याच्या तक्रारी मुंबईकरांमध्ये वाढल्या आहेत आणि मानदुखी, डोकेदुखी तसेच मणक्याचे दुखणे तर लोकल प्रवासानेच देऊन ठेवले आहे.
मर्यादित आसनांमुळे गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये अनेक प्रवाशांना उभेच राहावे लागते. अनेकदा तोल सावरण्यासाठी डोक्यावरचे हँडल पकडून उभे रहावे लागते. याचा विपरित परिणाम थेट पाठीच्या कण्यावर होतो. वारंवार ब्रेक लागणे किंवा अचानक कराव्या लागलेल्या हालचालींमुळे प्रवाशांच्या मानेवर आणि पाठीवर अतिरिक्त ताण येतो, व स्नायू दुखावले जातात. अनेकदा प्रवासी रेलिंगवर झुकतात किंवा मर्यादित जागेत अवघडल्या अवस्थेत तसेच उभे राहतात. त्याचाही मणक्यावर अतिरिक्त ताण येतो.
मीरा रोड येथील वोकहार्ट हॉस्पिटल्समधील मेंदू आणि स्पाइन सर्जन डॉ. मनोजकुमार गड्डीकेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकलमध्ये गर्दी असतानाही अनेक प्रवासी मोबाईल फोनचा जास्त वापर करतात. नीट उभे राहाता येत नसतानाही मेसेजिंग करणे, ब्राउझिंग करणे किंवा व्हिडिओ पाहणे, यात डोके सतत खाली झुकल्याने 'टेक्स्ट नेक'चा आजार जडतो. डोके तटस्थ स्थितीत ठेवले तरी ते मणक्यावर अंदाजे ४.५ ते ५.५ किलो वजन टाकते. मात्र, हेच डोके पुढे झुकवले तर हे वजन वाढते. डोके ३० अंश झुकवल्यास त्याचा दाब सुमारे १८ किलोपर्यंत वाढतो आणि ६० अंश झुकल्यावर तर डोक्याचे हेच वजन २७ किलोपेक्षा अधिक वाढून मणक्याला प्रचंड ताण देते. यातील धोका कमी करण्यासाठी, मुंबईकरांनी मान खाली वाकवण्याऐवजी आपला मोबाईल डोळ्यांच्या पातळीवर धरावा. हेडफोन किंवा व्हॉइस कमांड वापरल्याने स्क्रीन टाईम कमी होण्यास मदत होऊ शकते. केईएम रुग्णालयातील अस्थिव्यंग आणि स्पाईन सर्जन डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले की, लोकलमध्ये गर्दीत उभे राहण्यासाठी जागा नसल्याने मानेच्या आणि पाठीच्या डिस्कवर अतिरिक्त ताण आल्याने त्यांची ठेवण बदलू शकते. हाता, पायामध्ये मुंग्या येतात. स्पॉन्डिलायसिसच्या आजाराचाही सामन करावा लागतो. मानदुखी, पाठदुखी, खांदा दुखण्याच्या समस्याही लोकल प्रवासामुळे वाढत आहेत.
प्रवासादरम्यान साधे मानेचे स्ट्रेचिंग केल्याने जडपणा आणि अस्वस्थता टाळता येते.
जास्त वेळ उभे राहणे अटळ असेल, तर प्रवाशांनी त्यांचे वजन दोन्ही पायांवर समान प्रमाणात वाटून घ्यावे आणि वाकणे टाळावे.
ज्यांना जागा सापडते त्यांनी मणक्यावरील ताण कमी करण्यासाठी आपले डोके आसनावर टेकवावे. स्क्रीन वेळेतून नियमित ब्रेक घेतल्याने देखील मणक्यावरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.