पुणे : प्रहार संघटना, शरद जोशी विचारमंच व अन्य समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.7) शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांच्या मौजे आंबेठाण-अंगारमळा (ता.राजगुरुनगर) येथील ग्रामपंचायतीसमोरील दक्षिणमुखी मारुती मंदिराशेजारच्या मैदानावर सायंकाळी चार वाजता पहिल्या शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमुक्तीसह अन्य मागण्यांवर या परिषदेत ऊहापोह होऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती शरद जोशी विचारमंच संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी कळविली आहे. (Pune Latest News)
शेतकर्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रामुख्याने शेतकर्यांना संपूर्ण कर्ज मुक्ती मिळाली पाहिजे, सर्व प्रकारच्या शेतमालाला किमान हमीभाव(एम.एस.पी.), गायीच्या दुधाला प्रति लिटरला 48 रुपये व म्हैस दुधाला प्रति लिटरला 58 रुपये असा उत्पादन खर्चाशी निगडित दर मिळावा, सन 2025-2026 च्या ऊस गाळप हंगामासाठी प्रति टनास ऊसाला 4400 रुपये दर मिळावा, कांदा उत्पादक शेतकर्यांना किमान प्रति क्विंटलला 2500 रुपये दर मिळावा, दिव्यांगाना पेन्शन व मोफत घरे, 6 हजार रुपये पेन्शन, 55 वय वर्षानंतर शेतकर्यांना किमान 10 हजार रुपये पेन्शन, मेंढपाळ, व मच्छीमारांना संरक्षण, बेरोजगार, युवकांना नोकरी आदीसह अन्य मागण्यांचा समावेश आहे. शेतकर्यांच्या उसाच्या थकीत एफआरपीवर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 15 टक्के टक्के व्याज भरपाई हंगाम सुरू होण्यापूर्वी मिळावी. अन्यथा 2026-27 चा उस गाळप हंगाम सुरू होऊ दिला जाणार नाही.
राज्य सरकारने दोन सप्टेंबरच्या आत आमच्या मागण्यांवर निर्णय न घेतल्यास शेतकरी प्रहार संघटना परिवार 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्यादिवशी भगतसिंग यांच्या मार्गाने मुंबईत मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशाराही बच्चू कडू यांनी शासनास दिल्याचे पवार यांनी कळविले आहे.