लोकसंख्या वाढली, तरी गर्भनिरोधकांचा वापरही वाढला !

लोकसंख्या वाढली, तरी गर्भनिरोधकांचा वापरही वाढला !
Published on
Updated on

पुणे : लोकसंख्येबाबत भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश ठरला असल्याने लोकसंख्या नियंत्रणाचा विषय चर्चेत आला आहे. त्यासाठीच्या कार्यक्रमांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले, तरी राज्यातील नसबंदीच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मंद गतीने का होईना, पण वाढ होत असल्याचेही दिसून आले आहे. त्याचबरोबर छाया, अंतरा या गर्भनिरोधकांच्या वापराकडेही नागरिक वळत असल्याचे आकडे -वारीवरून स्पष्ट होते. कुटुंब नियोजनासाठी स्त्री नसबंदी, पुरुष नसबंदी केली जाते. तसेच, पाळणा लांबवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या, निरोध, तांबी यांचाही वापर केला जातो.

त्याचबरोबर डेपो मेड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन अर्थात 'अंतरा' इंजेक्शन आणि गर्भनिरोधक गोळी अर्थात 'छाया' सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. जनजागृती कार्यक्रमांमुळे पाळणा लांबवणार्‍यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. नसबंदी शस्त्रक्रियांमध्ये राज्यात गेल्या तीन वर्षांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण नसबंदी शस्त्रक्रियांमध्ये 95 हजारांनी वाढ झाली आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांमध्ये दोन हजारांनी वाढ झाली असली, तरी एकूण प्रमाण अजूनही अत्यल्प असल्याचे निदर्शनास येत आहे. पाळणा लांबवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या 'अंतरा' इंजेक्शनच्या लाभार्थींमध्ये दुप्पट आणि 'छाया' गोळ्या घेणार्‍या लाभार्थींमध्ये 15 हजारांनी वाढ झाली आहे.

काय आहे 'अंतरा' आणि 'छाया'?
कुटुंब नियोजन करू इच्छिणार्‍या महिलांना दर तीन महिन्यांनी 'अंतरा' इंजेक्शन पुरवले जाते आणि दर आठवड्याला 'छाया' गोळ्याही सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. दोन्ही गर्भनिरोधके सुरक्षित असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत राज्यात सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जात आहे. बालमृत्यू आणि मातामृत्यू रोखणे, दोन मुलांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाणे, कुटुंब नियोजनाच्या योजनांचा लाभ यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यावरही भर दिला जात आहे.

                     – डॉ. दिगंबर कानगुले, आरोग्य अधिकारी, कुटुंब कल्याण कार्यालय

अंतरा आणि छाया लाभार्थी
वर्ष अंतरा छाया
2020-21 23,683 1,70,976
2021-22 45,776 2,40,968
2022-23 87,636 3,86,111
नसबंदी शस्त्रक्रियांचे आकडे
वर्ष नसबंदी शस्त्रक्रिया पुरुष नसबंदी
2020-21 2,10,626 5276
2021-22 2,81,612 7414
2022-23 3,78,534 9534

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news