गडकोटांवर पर्यटकांची अलोट गर्दी; सिंहगडावर टोल वसूली जोरात

गडकोटांवर पर्यटकांची अलोट गर्दी; सिंहगडावर टोल वसूली जोरात

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रथमच रविवारी (दि. 12) सुटीच्या दिवशी सिंहगड किल्ल्यासह राजगड, तोरणा गडकोट तसेच खडकवासला, पानशेत परिसरात पर्यटकांची अलोट गर्दी उसळली होती. सिंहगडावर पर्यटकांकडून दिवसभरात 1 लाख 37 हजार 200 रुपयांचा टोल वसूल करण्यात आला.

सिंहगड किल्ल्यावर पंचवीस हजारांहून पर्यटकांनी हजेरी लावली. सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक कोलमडल्याने प्रचंड वाहतूक कोंडीत पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना अडकून पडावे लागले. रविवारी सकाळपासूनच पर्यटकांनी सिंहगडावर धाव घेतली. अतकरवाडी पायी मार्गानेही मोठ्या संख्येने पर्यटक गडावर येत होते. सकाळी अकरानंतर पर्यटकांची संख्याही दुपटीने वाढली.

सिंहगड घाटमार्गे कोंढणपूर, बंगळुरू महामार्गाकडे जाणारी वाहतूक आणि सुटीसाठी गडावर जाणार्‍या पर्यटकांच्या वाहनांमुळे डोणजे चौकापासून गोळेवाडी टोल नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे-पानशेत रस्ता, खडकवासला धरण चौपाटीसह खडकवासला, किरकटवाडी फाट्यावर वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दूर अंतरावर रांगा लागल्या होत्या. पोलिस यंत्रणा निवडणुकीत गुंतल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरक्षा रक्षक, अपुर्‍या कर्मचार्‍यांना रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उतरून वाहतूक कसरत करावी लागली.

सिंहगडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल

सिंहगडावर रविवारी दिवसभरात पर्यटकांची चारचाकी 666 व दुचाकी 1412वाहने गेली. वाहनचालक पर्यटकांकडून दिवसभरात तब्बल 1 लाख 37 हजार 200 रुपयांचा टोल वन विभागाने वसूल केला. गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्याने घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील, बाळासाहेब वाईकर, संदीप कोळी, नितीन गोळे , रमेश खामकर आदींसह सुरक्षा रक्षक रात्रीपर्यंत घाट रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी धावपळ करत होते.

राजगडावर दोन हजारांहून अधिक पर्यटकांची गर्दी

राजगड किल्ल्यावर दिवसभरात दोन हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. छत्रपती श्रीशिवरायांची राजसदर, पद्मावती माची, पाऊल वाटा, प्रवेशद्वार आदी परिसर पर्यटकांनी हाऊस फुल्ल झाला होता. तरुण, तरुणींसह मुलांची संख्या अधिक होती. दिवसभर वातावरण ढगाळ होते. लागोपाठ दोन दिवस अवकाळी पाऊस पडल्याने हवेत गारवा होता.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news