पुणे : शिरूरमध्ये घूमजाव होणार !

पुणे : शिरूरमध्ये घूमजाव होणार !
Published on
Updated on

बापू जाधव:

निमोणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभ्या फुटीनंतर शिरूर तालुक्यातील बहुतांश कार्यकर्ते व नेतेमंडळी शरद पवारांच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र दिसत असले, तरी पुढील दोन ते तीन दिवसांत ही सगळी मंडळी अजित पवारांच्या वळचणीला दिसली, तर नवल वाटायला नको, असाच जाणकार मंडळींचा होरा आहे. त्यामुळेच शिरूरमध्ये घूमजाव होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणाच्या सगळ्या नाड्या अजित पवार यांच्या हातात असल्यामुळे शरद पवारांवर कितीही प्रेम असले, तरी अजित पवारांच्या थेट विरोधात जाण्याची धमक सध्याच्या घडीला कुणी दाखवेल अशी परिस्थिती नाही.

मागील अनेक वर्षे शरद पवार राष्ट्रीय राजकारणात असल्यामुळे जिल्ह्यातील सगळ्या घडामोडींशी अजित पवारांचा थेट सबंध राहिला आहे. शिरूरच्या पूर्व भागातील एक सहकार नेता जो आजच्या घडीला भाजपचे व्यासपीठ गाजवतो, तो बदलत्या राजकीय परिस्थितीत लगोलग अजित पवारांच्या भेटीला रवाना झाला. भविष्यातील राजकीय समीकरणे ओळखून शिरूर राष्ट्रवादीमध्ये प्रचंड खलबते घडत आहेत. साहेब दैवत आहे हे मान्य; पण बळ कोण देणार? विविध आर्थिक संस्थांची परिस्थिती दिवसेंदिवस प्रतिकूल होत असल्याने काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि यासाठी अजित पवारांचे बळ हवे, ही चर्चा प्रचंड जोर धरत असल्याने तालुक्याच्या राजकारणात पुढील दोन ते तीन दिवसांत प्रचंड उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.

शिरूर-हवेलीच्या राजकारणात आजच्या घडीला भाजपच्या पहिल्या फळीतील जे नेतृत्व दिसते, ते कधीकाळी अजितदादांच्या छत्रछायेमध्येच घडले असल्याने त्या मंडळींना बळ मिळू शकते. भविष्यातील राजकारणात कोण कोणाच्या वळचणीला जाऊन विधानसभेला दावेदारी सांगेल, याचा काहीही भरवसा राहिला नसल्यामुळे प्रत्येक जण सावध भूमिका घेऊन सत्तेच्या वळचणीला आश्रय शोधत आहे, हे कुणीही नाकारणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news