बनावट मिठाईवर एफडीएचा ‘वॉच’ पाच लाख 10 हजारांचा साठा जप्त;

बनावट मिठाईवर एफडीएचा ‘वॉच’ पाच लाख 10 हजारांचा साठा जप्त;
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  'दिवाळीच्या दिवसांमध्ये मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मिठाई खरेदी करताना नागरिकांनी 'एक्सपायरी डेट'बाबत सजग राहावे,' असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बनावट आणि मुदतबाह्य मिठाईच्या तपासणीसाठी एफडीएकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांना कायद्याअंतर्गत तरतुदींचे पालन करूनच व्यवसाय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अन्न आणि औषध प्रशासन पुणे कार्यालयातर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तपासणी नमुने घेण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत 1 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत मिठाई (28 नमुने ), खवा – दोन, रवा / मैदा/ बेसन (12), खाद्यतेल (7), वनस्पती /घी (2), नमकीन (3) आणि इतर अन्नपदार्थ (16) असे एकूण 70 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. खाद्यतेल पॅकिंगसाठी जुन्या डब्याचा पुनर्वापर केल्याचे आढळून आल्याने तीन ठिकाणी चार लाख 51 हजार 400 रुपये किमतीचा साठा, हिरवा वाटाण्याचा 39 हजार 800 रुपयांचा, मिठाईचा सहा हजार 750 रुपयांचा आणि घी / खव्याचा 12 हजार 400 रुपयांचा असा एकूण पाच लाख 10 हजार 400 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

गुजरात बर्फीचा वापर करून मिठाई बनवणार्‍या दुकानदारांवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने कारवाई केली. यामध्ये पाच लाख 90 हजार 400 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. एफडीएच्या पुणे विभागाला मिळालेल्या माहितीनुसार 17 ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

अशोक राजाराम चौधरी यांच्या वाहनातून गुजरात बर्फी स्वीट हलवा (व्हानवटी), रिच स्वीट डिलाईट (बि—जवासी), स्वीट हलवा (बि—जवासी), स्वीट हलवा (पारस), स्पेशल बर्फी आणि स्वीट हलवा या अन्नपदार्थांचे सहा नमुने तपासणीसाठी घेऊन उर्वरित पाच लाख 90 हजार 400 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. गुजरात बर्फी हा अन्नपदार्थ पुणे शहरातील मंडईतील अग्रवाल स्वीट मार्ट, कोंढवा बुद्रुकमधील मानसरोवर येथील कृष्णा डेअरी फार्म, देहूरोड, गहुंजे येथील अशोक राजाराम चौधरी आणि बालेवाडी येथील हिरसिंग रामसिंग पुरोहित यांनी गुजरात आणि पालघर जिल्ह्यातील वसई येथून मागवला असल्याचे आढळून आले. विक्रेत्याकडे गुजरात बर्फीचा वापर कशासाठी करण्यात येत होता, याबाबत अधिक तपास करून कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएतर्फे कळवण्यात आले आहे.

सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रेवर 'बेस्ट बिफोर' दिनांक नमूद करणे बंधनकारक आहे. याशिवाय मिठाई बनवण्यासाठी स्वीट खवा (गुजरात बर्फी)चा वापर न करता दुधापासून बनवलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा. स्वीट खव्याचा वापर करून मिठाई बनवत असल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
                                                     – संजय नारागुडे, सह आयुक्त (अन्न) एफडीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news