पुणे : हडपसर महापालिकेसाठी सर्वपक्षीय एकवटले ; ‘ब’ दर्जासाठी आग्रही

पुणे : हडपसर महापालिकेसाठी सर्वपक्षीय एकवटले ;  ‘ब’ दर्जासाठी आग्रही
Published on
Updated on

हडपसर : पुढारी वृत्तसेवा :  हडपसर पूर्व भागासाठी नवीन स्वतंत्र महापालिका होण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. पूर्व भागाच्या विकासासाठी ही महापालिका झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडत यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार राजकीय नेते व विविध संघटनांच्या बैठकीत करण्यात आला. राज्य सरकारने पूर्व हडपसर ही स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यासाठी पुणे महापालिकेकडून अभिप्राय मागविला आहे. या पार्श्वभूमीवर हडपसर येथे मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते.

आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास तुपे, हडपसर भाजीपाला सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण तुपे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, योगेश ससाणे, गणेश ढोरे, राहुल शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले आदी उपस्थित होते.

आमदार तुपे म्हणाले, 'हडपसरलगत गावांच्या विकासासाठी 'ब' दर्जाची महापालिका होण्यासाठी मी सातत्याने विधानसभेत प्रश्न लावून धरला आहे. पूर्व भागाच्या विकासासाठी स्वतंत्र महापालिकेची आवश्यकता आहे.' प्रवीण तुपे म्हणाले, 'वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे महापालिका हडपसर व उपनगरांतील गावांचा विकास करू शकणार नाही. त्यामुळे हडपसरपासून वाघोली, उरुळी कांचनपर्यंत नवीन 'ब' दर्जाची महापालिका झाली पाहिजे. यासाठी आम्ही नागरिक कृती समिती तयार करून मागणी करीत आहोत.'

नवीन महापालिकेसाठी जनआंदोलन झाले पाहिजे, असे मत जगन्नाथ शेवाळे यांनी व्यक्त केले. फुरसंगी व उरुळी देवाची नगरपरिषदेमुळे आमचा विकास होणार नाही. हडपसर महापालिका झाल्यानंतर आमची गावे या महापालिकेत समाविष्ट करण्याची भूमिका अमोल हरपाळे यांनी मांडली. राहुल शेवाळे म्हणाले की, पुणे महापालिका या भागातून कोट्यवधी रुपयांचा कर गोळा करीत आहे. त्या तुलनेत सुविधांची वानवा आहे. यामुळे नवीन महापालिका होणे काळाची गरज आहे.

पूर्व हडपसरसाठी स्वतंत्र महापालिका होणे चांगलेच; पण त्या अगोदर पाणी, मलनिस्सारण आणि कचरा प्रश्नाबाबत विचार होणे गरजेचे आहे. आता महापालिकेत आहोत. पण, गडबडीत निर्णय घेणे अंगलट येईल, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
                                               – राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर

गेल्या अनेक वर्षांपासून हडपसर महापालिकेचा निर्णय प्रलंबित आहे. पुणे महापालिकेवर मोठा ताण येत आहे. महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे हडपसरसाठी स्वतंत्र महापालिका होणे गरजेचे आहे.
                                            – बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री

आता घाईगडबडीत नवीन महापालिका झाली, तर ती 'ड' दर्जाची होईल. हा दर्जा असलेल्या सोलापूर आणि अहमदनगर महापालिकेचा अद्यापही विकास होऊ शकला नाही. आता विचार केला, तर आपण हडपसर-हवेली स्वतंत्र महापालिका करणे योग्य नाही.
                                       – प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news