इंदापुरातील सर्व निवडणुकांचे चित्र बदलणार; महायुतीला आत्मपरीक्षण करायला लावणारा विजय

इंदापुरातील सर्व निवडणुकांचे चित्र बदलणार; महायुतीला आत्मपरीक्षण करायला लावणारा विजय

[author title="जावेद मुलाणी " image="http://"][/author]

इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. खा. सुळे यांना इंदापुरातून 25 हजार 689 मतांची आघाडी मिळाली.नेत्यांची फौज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या मागे असताना देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर इंदापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह इंदापूर विधानसभा निवडणुकीचे चित्रदेखील बदलणार आहे.

महायुतीच्याने आत्मपरीक्षण करावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीने मोठी ताकद सुनेत्रा पवार यांच्या मागे उभी केली होती; मात्र शरद पवार यांचे बेरजेचे राजकारण, मुरब्बी राजकारणी म्हणून असलेली त्यांची ओळख आणि त्यातून केलेले खेळी याने सुप्रिया सुळे यांचा विजय सुकर झाला.

इंदापूर तालुक्यातून मागील वर्षी पेक्षा मतदानाची आघाडी कमी झाली असली तरी त्यांच्या विरोधात इंदापूर तालुक्यातील आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने, भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे, जिल्हा परिषद गटाचे सात सदस्य, पंचायत समिती गटाचे प्रदीप जगदाळे वगळता 13 सदस्य, दोन्हीही कारखान्याचे संचालक अशी शेकडो नेतेमंडळींची फौज त्यांच्या मागे असताना देखील खा. सुळे यांनी तालुक्यातून घेतलेली आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.

सुप्रिया सुळेंना जनतेचा पाठिंबा

सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मतदारसंघ पिंजून काढत गावोगावी प्रचार यंत्रणा उभी केली होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा त्यांना पाठिंबा मिळत गेला. सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतल्याने व महायुतीच्या उमेदवार निश्चित नसल्याने महायुतीमध्ये सुरू असणारे शाब्दिक वाकयुद्ध सुनेत्रा पवार यांना भोवल्याचे दिसून येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती होईल का याबाबत शंका असून स्वतंत्र निवडणूक लढवल्या जाण्याची शक्यता कार्यकर्त्यांमधून वर्तवली जात आहे.

सुप्रिया सुळे यांच्या विजयामध्ये पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अमोल भिसे, सागर मिसाळ यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. इंदापूर शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना धोबीपछाड देत माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय सचिव अ‍ॅड. राहुल मखरे यांनी शहरातून सुप्रिया सुळे यांना आघाडी दिली आहे. त्यामुळे इंदापूर नगर परिषदेसाठी पुन्हा चुरस निर्माण होणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या महाविकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेला देखील असे चित्र पाहायला मिळणार आहे.

अजित पवारांच्या आठ सभेचा इंदापुरात प्रभाव पडलाच नाही

महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी स्वतः प्रचाराच्या रणांगणात उतरलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत होते. इंदापूर विधानसभा हा अलीकडील काळात पवारांचा घरचा मतदारसंघ मानला जातो. याच मतदारसंघात अजित पवारांचे खंदे समर्थक आमदार दत्तात्रय भरणे हे 2014 पासून तालुक्याचे नेतृत्व करत आहे.

ज्या पद्धतीने अजित पवारांचा इंदापूर तालुक्याशी दांडगा संपर्क आहे, अगदी तसाच संपर्क विरोधी उमेदवाराचाही आहे. ही बाब ओळखून अजित पवारांनी इंदापूर विधानसभेत प्रथमच आठ प्रचार सभा घेतल्या. तरी देखील अजित पवारांची जादू चालली नसल्याची चर्चा रंगली आहे. याउलट शरद पवार यांनी इंदापूर तालुक्यात केवळ तीन सभा घेतल्या होत्या.

गत निवडणुकीपेक्षा खा. सुळे यांचे मताधिक्य घटले

  • 2019 ला 70 हजार 938 आघाडी
  • 2024 ला 25 हजार 689 मतांची आघाडी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news