loksabha election 2024 result : श्रीरंग बारणेंची हॅट्रिक; संजोग वाघेरेंचा पराभव

loksabha election 2024 result : श्रीरंग बारणेंची हॅट्रिक; संजोग वाघेरेंचा पराभव

पिंपरी : सलग तिसर्‍यांदा विजयी होत विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवण्यास यश मिळविले. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे पाटील यांचा 96 हजार 615 मतांनी पराभव केला. शिवसेनेचे (शिंदे गट) बारणे यांना 6 लाख 92 हजार 832 आणि वाघेरे यांना 5 लाख 96 हजार 217 मते मिळाली. नवखे असूनही, वाघेरे यांनी दिलेली लढत वाखाणण्याजोगी ठरली.

दापोडी-बोपखेल येथील मुळा नदीपासून ते उरणाच्या समुद्रापर्यंत असा मोठ्या क्षेत्रात विस्तारलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. विद्यमान खासदार बारणे यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली. दोन्ही प्रमुख उमेदवार पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक उमेदवार असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे मंगळवारी (दि.4) सकाळी आठ वाजता मजमोजणीला सुरुवात झाली.

पहिल्या फेरीत बारणे यांनी 5 हजार 731 मतांची आघाडी घेतली. बारणेंची आघाडी फेरीनिहाय वाढत केली. पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी या विधानसभा मतदारसंघात सर्वत्र बारणे यांनी मताधिक्य राखण्यात यश मिळविले. एकूण 25 फेर्‍यांपैकी केवळ दोन फेर्‍यात वाघेरे यांनी आघाडी घेऊनही ती बारणेंचे मताधिक्य तोडण्यात अपुरी ठरली. बारणे यांनी फेरीनिहाय आघाडी कायम राखली. शेवटच्या 26 व्या फेरीअखेर बारणे यांनी 6 लाख 92 हजार 832 मते घेतली.

तर, वाघेरे यांना 5 लाख 96 हजार 217 मते मिळाली. तब्बल 96 हजार 615 मताधिक्याने बारणे यांनी विजयाची हॅट्रटिक साधली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या परिसरात तसेच, बारणे यांच्या निवासस्थानी गुलाल उधळत जल्लोष केला. दरम्यान, काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक बारणे यांनी मावळ लोकसभेत सन 2014 आणि सन 2019 असे सलग दोन विजय मिळविले. त्यापूर्वी सन 2009 मध्येही शिवसेनेचे गजानन बाबर हे विजयी झाले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news