भीमाशंकर: श्री क्षेत्र भीमाशंकर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रावणी चौथ्या सोमवारी (दि. 18) ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील बळीराजाला सुखी कर, समृद्ध कर, असे साकडे घातले. यावेळी त्यांनी शिवलिंगावर जलाभिषेकही केला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीमाशंकरचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कैदरे, सरपंच दत्तात्रय हिले, कार्यकारी विश्वस्थ मधुकर गंवादे, चंद्रकात कैदरे, रत्नाकर कोडीलकर, गोरख कैदरे, प्रसाद गंवादे, आशिष कोडीलकर आदी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, भीमाशंकर विकास आराखड्यास निधी कमी पडू देणार नाही. (Latest Pune News)
ज्ञानवापसी कुंड मोठे व दर्जेदार करण्यात येईल. 2027 च्या कुंभमेळाव्यासाठी भीमाशंकरला आवश्यक उपयोजना व मदत केली जाईल. दरम्यान, दर्शनाला येताना शिंदे यांनी चिंचोली कोकणेची प्राथमिक शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
त्यानंतर पुढे घोडेगाव ते भीमाशंकर दरम्यान विविध ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. भीमाशंकरमधील वाहनतळ क्रमांक पाच येथे एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक टी. एन पवळे व मारुती खळतकर यांनी शिंदे यांना एसटीच्या अडचणींबाबत निवेदन दिले.