

पुणे: अक्षय्य तृतीयेचा सण आज बुधवारी (दि. 30) आनंदात आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे. सणानिमित्ताने मंदिरांमध्ये खास तयारी करण्यात आली असून, मंदिरे दर्शनासाठी दिवसभर खुली राहणार आहेत. त्याशिवाय भजन-कीर्तनासह प्रवचन, भक्तिगीतांचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत. अनेकांनी वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दागिन्यांच्या बुकिंगचा मुहूर्त साधला.
नवीन व्यवहारास शुभ दिवस
दाते पंचांगकर्तेचे मोहन दाते म्हणाले, वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून, नवीन वाहन, वास्तू खरेदी, सोने खरेदी, नवीन व्यवहार करण्यास हा दिवस शुभ आहे. या दिवशी पितरांचे श्राद्ध करतात. अक्षय्य तृतीयेस जप, दान, होम केल्याने ते अक्षय्य (म्हणजे कधीही न संपणारे) पुण्यकारक ठरते. (Latest Pune News)
अक्षय्य तृतीयेला मातीचे दोन घट पाण्याने भरून एकात तांदूळ आणि दुसर्यात तीळ घालून त्यांना दोरा गुंडाळावा, ते घट धान्यावर ठेवावेत. ब्रह्म-विष्णू-शिवस्वरूपात त्यांची पूजा करून दान करावे. त्यामुळे पितर तृप्त होतात आणि मनोरथ पूर्ण होतात, असे सांगितले जाते. या दिवशी पितरांचे श्राद्ध करणे न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे. उन्हापासून रक्षण करणार्या वस्तूंचे दान करावयाचे असते.
सोन्याला अनेक पर्याय निर्माण झाले आहेत. तरीही ‘गोल्ड इज गोल्ड’ म्हणत नागरिकांनी शहरातील विविध सराफांच्या पेढ्यांवर सुवर्णनोंदणीसाठी मागील दोन दिवसांपासून गर्दी केल्याचे चित्र आहे. लग्नसराईच्या अनुषंगाने मंगळसूत्र, बांगड्या, नेकलेस आदी दागिन्यांच्या खरेदीचे पर्याय उपलब्ध आहेत, तर सोन्याच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर वजनाने हलके दागिनेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
यामध्ये चेन, अंगठ्या, कानातले आदींचे पर्याय उपलब्ध आहेत. लग्नसराई असो की मुहूर्ताची खरेदी बहुतांश नागरिक आठवडाभरात दागिन्यांची नोंदणी करतात. त्यानंतर मुहूर्तावर खरेदी करीत दागिने घरी घेऊन जातात. सद्य:स्थितीत जगातील अस्थिर परिस्थिती, अस्थिर शेअर बाजार, वाढती महागाईच्या काळात समाजातील काही लोक सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. अशा लोकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत असल्याचे ‘देवकर ज्वेलर्स’चे संचालक दत्तात्रय देवकर यांनी सांगितले.
मार्केट यार्डात गर्दी
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला मार्केट यार्डातील घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात आंबा खरेदीसाठी मंगळवारी (दि.29) नागरिकांनी गर्दी केली होती. ग्राहकांकडून 1 आणि 2 डझनांच्या पेटीला मागणी होत असून, डझनाची प्रतवारीनुसार 400 ते 800 रुपयांना विक्री सुरू होती.
साडेतीन मुहूर्तांपैकी संपूर्ण मुहूर्त असलेला हा सण. या दिवशी पूर्वजांना आमरस नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. त्यानुसार आंबे खरेदी करण्यात येत होते. रत्नागिरी हापूसची आवक बाजारात वाढली आहे. दररोज सुमारे 5 हजार पेटी आवक होत आहे. ही आवक मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. यंदा हवामानबदलाचा फटका बसल्याने उत्पादन कमी झाल्याने यंदाची ही सर्वोच्च आवक आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून आवक होत आहे. 30 मार्च रोजी गुढी पाडवा होता. त्यावेळी हापूसला डझनाला 1 हजार ते 1800 रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता भाव आवाक्यात आल्यामुळे मागणी वाढली आहे. तसेच, काही लोक अक्षयतृतीयेपूर्वी आंबा खात नाहीत. त्यांच्याकडून आवर्जून आंब्याची खरेदी करण्यात येत आहे.
मोगरा आणि गुलछडीला मागणी जास्त होती. त्यामुळे कालच्या (दि. 28) तुलनेत दोन्ही फुलांच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे. मोगर्याला घाऊक बाजारात दर्जानुसार किलोला 300 ते 600 रुपये, तर गुलछडीला 280 ते 400 रुपये भाव मिळाल्याचे माहिती अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनचे समन्वयक सागर भोसले यांनी दिली.