

Akshay Kumar and Arshad Warsi summoned for offensive jokes
पुणे: हिंदी चित्रपटात स्वातंत्र्याच्या नावाखाली कलाकार व निर्माते यांनी थेट वकील व न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केल्याप्रकरणी न्यायालयाने चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार यांना समन्स बजावले आहे. दि. 28 ऑगस्ट रोजी निर्मात्यासह अभिनेता अक्षयकुमार, अर्शद वारसी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
चित्रपट प्रदर्शनावर मनाई हुकूम मिळण्यासाठी पुण्यातील दोन वकिलांनी दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश जे. जी. पवार यांनी हे आदेश दिले आहेत. वकील आणि न्यायालयाभोवती फिरते असे चित्रपटाचे कथानक दाखविण्यात आले आहे. मात्र स्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटातील कलाकार व निर्माते यांनी चित्रपटात थेट वकील व न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केले आहेत. (Latest Pune News)
चित्रपटातील कलाकार अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांनी वकिलांचा बॅण्ड (बो) घालून चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे वकिलांची प्रतिमा मलीन करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर चित्रपटात वकिली व्यवसायाचा अवमान करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये याकरिता अॅड. वाजेद खान (बिडकर) व अॅड. गणेश म्हस्के यांनी मा. दिवाणी न्यायाधीश पुणे यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवर्यात सापडला आहे.