बारामती/शिवनगर: ‘माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मी सगळ्यांशी बोलून चाचपणी केली. पण, काहींचा हट्ट आड येतो आहे. ते हट्टी असतील, तर मीसुद्धा दुप्पट हट्टी आहे. अरे बाबा, थांब ना कुठे तरी... पण नाही. ते थांबायला तयार नाहीत.
मग मलाही एकदा बघायचेच आहे काय होते ते,’ असा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘माळेगाव’मधील मुख्य विरोधक तावरे गुरू-शिष्याला आव्हान देत मी लढणारच आहे; पण माझे पॅनेल सर्वपक्षीय असेल. ज्यांना कोणाला यायचे, त्यांचे स्वागत आहे, या शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.(Latest Pune News)
बारामतीतील राष्ट्रवादी भवनात माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे या विरोधकांवर जोरदार टीका करीत स्वतःच्या संचालक मंडळाच्या कारभाराचेही वाभाडे काढले. काही गोष्टी चुकल्याची कबुली देत त्या दुरुस्त केल्या जातील, असा शब्द दिला.
काही जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन येथे काहीबाही सांगत आहेत. पण, मीसुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगेन की, मग मलाही तुमच्या मतदारसंघात लक्ष घालावे लागेल, असे म्हणत पवार यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनाही इशारा दिला. त्यांचा रोख माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे या गुरू-शिष्याच्या जोडीकडे होता.
या दोघांचा थेट नामोल्लेख टाळत ते म्हणाले, काहींचे वय झालेय; पण तरीही मलाच पाहिजे, असा हट्ट सुरू आहे. अशाने इतरांना संधी कधी मिळणार? यातील एक जण तर पाच वर्षे संचालक मंडळाच्या बैठकीलाच आले नाहीत, दुसरे अडीच वर्षे फिरकले नाहीत. मी फक्त राष्ट्रवादीचे पॅनेल करणार नाही. ‘छत्रपती’प्रमाणे सर्वपक्षीय पॅनेल असेल. इतर पक्षांतील चांगल्या लोकांचेही स्वागत केले जाईल.
‘माळेगाव’च्या निवडणुकीसाठी काहींना चैनच पडत नव्हती. ते रोज मुंबईला हेलपाटे घालत होते. पण, सहकार खाते आमच्याकडे आहे. आम्हीसुद्धा महायुतीत काम करतो, हे ते विसरले. इथे अमित शहा यांचे नाव घेऊन काही गोष्टी सांगितल्या जात आहेत. अरे शहाण्यांनो, तुम्हाला अमित शहा ओळखतात तरी का? असा टोला अजित पवार यांनी तावरे गुरू-शिष्यांना लगावला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात आजवर झाले नाही एवढे काम पुढील पाच वर्षांत करून दाखवणार आहे. केंद्र, राज्य सरकारच्या योजनांचा फायदा सभासदांना करून देणार आहे. कारखान्याला विविध पुरस्कार मिळाले आहेत. सुरुवातीला बाळासाहेब तावरे व त्यानंतर केशवराव जगताप यांनी चांगले नेतृत्व केले.
15 लाख टन गाळपाचा विक्रम केला. शरद पवार यांचेही ’माळेगाव’बाबत मोठे योगदान आहे, हे विसरता येणार नाही. पण, सध्या काही जण समोरच्यांनी पॅनेल केल्याची चर्चा दबक्या आवाजातच करीत आहेत. कितीही पॅनेल होऊ द्या, तुम्हाला चांगला भाव दिला आहे, स्वभांडवल गुंतवणूक 100 कोटींच्या वर नेली आहे. चांगल्या दराने साखर विक्री केली आहे. मागच्या काळातील मध्यम व दीर्घ मुदतीचे 59 कोटींचे कर्ज फेडले आहे.
एफआरपी सॉफ्ट लोनची परतफेड केली आहे. मागच्या काळातील रजेच्या पगारापोटी आम्ही 3 कोटी रुपये दिले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलून माळेगाव हार्वेस्टरवर आणण्याचा माझा प्रयत्न राहील. ’माळेगाव’ने 16 कोटी आरोग्य विमाहप्ता भरला. त्यातून 27 कोटींचा लाभ सभासदांना झाला. साखरनिर्मिती, डिस्टिलरी, वीजनिर्मिती, संजीवनी खतनिर्मिती प्रकल्प, यामुळे चांगला ऊसदर देता आला. खोडकी बिलाचा ठराव आधीच करून ठेवल्याने आचारसंहिता लागली, तरी ती रक्कम सभासदांना मिळेल.
चेअरमनचे नाव 13 जूनला घोषित
‘श्री छत्रपती’प्रमाणे प्रचार शुभारंभावेळीच 13 जूनला मी चेअरमन कोण होणार? हे जाहीर करणार आहे. अन्य पाच गटांना प्रत्येकी एक वर्ष याप्रमाणे उपाध्यक्षपद दिले जाईल. कारखान्यात नोकरभरती करताना मी आता कोणाचे लाड करणार नाही. कोणी कोणी काय काय उद्योग केले? हे माझ्या कानावर आले. त्याचा परिणाम मी ऊसदरावर होऊ दिला नाही. सभासदांना चांगला दर दिला.
गाड्या, हॉटेल असले लाड नाहीत
नवीन संचालक मंडळाला गाडी मिळणार नाही. फक्त चेअरमन गाडी वापरतील. ज्यांना गाड्या हव्यात, त्यांनी माझ्या पॅनेलमध्ये येऊ नये. मी हे सगळे थांबवणार आहे. संचालकाला तोडणी वाहतूक शिफारस करता येणार नाही. ते फक्त शेतकी अधिकारीच ठरवतील. काही संचालक माझ्यामागे नको ते धंदे करतात आणि बदनामी माझी होते, ही काय पद्धत?