टाकळी भीमा: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पावसाळ्याच्या तोंडावर सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूची खोदाई अपूर्ण असल्यामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. खोदलेल्या भागात पावसाचे पाणी साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिक्रापूर-न्हावरा मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणार्या पावसामुळे खोदलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Latest Pune News)
घोलपवाडीत परिस्थिती बिकट
टाकळी भीमा येथील घोलपवाडी परिसरात रस्त्याची एक बाजू पूर्णपणे खड्ड्यात आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यावर तळे निर्माण झाले आहे. रस्ता दिसत नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मार्ग ओळखणे अशक्य बनले आहे.
परिणामी, काही वाहने पाण्यात अडकून बंद पडली. ही माहिती मिळताच पोलिस पाटील प्रकाश करपे, विजय चव्हाण, हरी ओम पासवान, गणेश देवकाते, विक्रम वडघुले, किशोर घोलप आणि सोमनाथ चौधरी या ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यात अडकलेली वाहने बाहेर काढली.
त्यांनी रस्त्यावर दगड आणि झाडांच्या फांद्या टाकून पाण्याचा मार्ग बंद करून वाहतुकीला योग्य दिशा दिली. नागरिकांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठ्या दुर्घटना टळल्या. वाहनचालकांनी या नागरिकांच्या कार्यक्षमतेचे विशेष कौतुक केले आहे. मात्र, संबंधित प्रशासकीय अधिकार्यांची दुर्लक्षी भूमिका यामुळे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी काळजीपूर्वक वाहतूक करावी. लवकरच सुरक्षा बोर्ड लावून आणि भराव वाढवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल. प्रवाशांना त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.
- प्रेरणा कोटकर, उपअभियंता, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग