

Ajit Pawar on loan waiver decision
बारामती: राज्याच्या विविध भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकरी कर्जमाफीची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीवर योग्य वेळी निर्णय घेवू अशी मोजकी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
शनिवारी (दि. २७) सकाळी त्यांनी बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागाचा दौरा सुरु केला. यावेळी ते बोलत होते. सगळी सोंगं आणता येतात... पैशाचे नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार पूरग्रस्त भागात पाहणी करताना म्हणाले होते. त्यावर विरोधकांनी मोठी टीका केली होती. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने आहाकार माजवला आहे. (Latest Pune News)
शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूर आले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची व कर्जमाफी करण्याची मागणी होत आहे. यावर पवार यांनी योग्य वेळी निर्णय घेवू, असे स्पष्ट केले.
पवार म्हणाले, सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पावसामुळे हाहाकार झाला आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पाच ते सहा दिवसांचा 'रेड अलर्ट' सांगितला आहे. या पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. त्यासाठी मदत करणे. या कामाला आम्ही लागलो आहोत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे, केंद्राकडून मदत मिळण्याबाबतच्या प्रश्नावर पवार म्हणाले, नुकतेच केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत आम्हा तिघांच्या सहींचे पत्र दिले होते. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याचे ठरले होते. महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या वतीने सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्ग कोपला आणि ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकार तर कटिबद्ध आहेच. परंतु त्यामध्ये केंद्र सरकारची ही मदत व्हावी. अशी अपेक्षा पंतप्रधानांकडे व्यक्त केली आहे असे अजित पवार यावेळी म्हणाले.