

Ajit Pawar plane crash
कोलकाता : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. या घटनेवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र धक्का व्यक्त केला असून, या भीषण अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने मला प्रचंड धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला, ही बातमी ऐकून खूप दुःख झाले. हे नुकसान कधीही भरून न येणारे आहे."
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा असलेल्या ममता बॅनर्जी यांनी पवार कुटुंबाप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. "मी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह संपूर्ण कुटुंब आणि अजितदादांच्या समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे. मात्र, ही घटना कशी घडली याची योग्य आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे," अशी मागणी त्यांनी केली आहे.
अजित पवार यांना घेऊन येणाऱ्या खासगी विमानाचा बारामती एमआयडीसी परिसरातील विमानतळावर उतरत असताना अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात आज अजित पवार यांच्या चार प्रचारसभा होणार होत्या. त्यासाठी ते मुंबईहून सकाळी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रक्रियेत असतानाच तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासाअंतीच स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.