Pune Development Ajit Pawar Order PMRDA :
पुण्याच्या विकासाबाबत गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री अजित पवार सातत्यानं बैठका आणि पाहणी दौरे करत आहेत. पुण्यात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे आणि ट्रॅफिक जाम होण्याची मोठी समस्या भेडसावत आहे. त्याचबरोबर अनधिकृत बांधकाचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. याच्यावर तोडगा काढण्यासाठी अजित पवार सतत बैठका घेत आहेत.
दरम्यान, अजित पवार यांनी आपल्या पाहणी दौऱ्यानंतर २३ गावांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी या २३ गावांच्या बांधकाम परवानगी आता महापालिका देईल असा आदेश दिला. ३० जून २०२१ मध्ये २३ गावं पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती. त्यासाठी विशेष प्राधिकरण म्हणून पाएमआरडीएला बांधकाम परवाने देण्याचे अधिकार देण्यात आले होते.
नागरिकांना बिल्डरकडून मिळणाऱ्या सुविधा मिळत नव्हत्या. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केशवनगर आणि मुंढवा भागातील समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पीएमआरडीए आयुक्तांना बांधकाम परवान्याबाबत आदेश दिले. अजित पवार यांनी याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो कारण ते प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत असं देखील सांगितलं. यानंतर बांधकाम परवानगीचे अधिकार महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या.
दरम्यान, रविवारी अजित पवार यांनी केशवनगर, मुंढवा आणि घोरपडी येथील नागरिकांशी संवाद साधला होता. त्यावेळी तेथील नागरिकांनी बिल्डरच्या चुकीमुळं पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावत असल्याची तक्रार केली होती. त्यावेळी अजित पवार यांनी बिल्डरांची मस्ती उतरवायची असेल तर त्यांचं काम थांबवा असं सुनवलं होतं. कारवाई करण्याचे अधिकार हे प्रशासनाच्या हाती असल्याचं देखील ते म्हणाले होते.