बारामती: बारामती शहरात असलेला भटक्या जनावरांचा वावर व त्याबाबत नागरिकांच्या प्राप्त होणार्या तक्रारी घेत नगरपरिषदेने बंदोबस्त करावा. शहरातील विविध भागांत कोंडवाड्यासाठी जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
अजित पवार यांनी शनिवारी (दि. 19) बारामती परिसरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, दशक्रिया घाट, शारदा प्रांगण येथील विविध विकासकामे, प्रस्तावित माळावरची देवी ते जळोची चौक चारपदरी रस्ता, जळोची कॅनॉल पुलावरून संभाजीनगरकडे जाणारा रस्ता, कॅनॉललगतची गार्डन जागा, जळोची ओढ्याशेजारील दशक्रिया घाट, दहनभूमी, दफनभूमी जागा, रुई हद्दीतील विद्या प्रतिष्ठानशेजारील दोन लहान पूल, गार्डन, स्मशानभूमी, पूरसंरक्षक भिंतीच्या प्रस्तावित जागेची पाहणी करून संबंधित अधिकार्यांकडून माहिती घेतली. (Latest Pune News)
कामांची पाहणी केल्यानंतर अजित पवार म्हणाले, कामात अडथळा आणणार्यावर पोलिसांनी कारवाई करावी. या परिसरातील रुई-जळोची ओढारुंदीकरणाची कामे करताना मोजणी करून त्यामध्ये अतिक्रमण असल्यास ती काढावीत. ओढ्याच्या दोन्ही बाजूस पूरसंरक्षक भिंत बांधावी.
शारदा प्रांगण परिसरात उभारण्यात येणारी शाळा इमारत विद्यार्थी व शिक्षकांना लागणार्या पायाभूत सुविधांचा विचार करून बांधावी. पालखी सोहळ्यातील वारकर्यांकरिता सोयी-सुविधांचा करून शौचालय, पाणी, विद्युतव्यवस्था आदींच्या अनुषंगाने कामे करावीत. बाबूजी नाईकवाडा, दशक्रिया घाट परिसरात सावली देणारी झाडे लावावीत. कविवर्य मोरोपंत यांच्या स्मारकाची डागडुजी करावी.
या वेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव विकास ढाकणे, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी किशोर माने, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, मल्हार करवंदे, समीर दाते आदी उपस्थित होते.
स्वच्छतेसाठी ग्लूटन लिटर पिकिंग मशिन
आदर पूनावाला स्वच्छ शहर उपक्रमांतर्गत स्वच्छतेसाठी 4 ग्लूटन लिटर पिकिंग मशिन देण्यात आल्या आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या नगरपरिषदेच्या सेवेत दाखल करण्यात आल्या.