

माणिक पवार
नसरापूर : कामाचा माणूस आणि शब्दांचा पक्का म्हणून ओळखले जाणारे राज्याचे कणखर नेतृत्व करणारे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघात निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असतानाच भोर आणि राजगड तालुक्यात देखील सर्व समावेशक घटकातून ' आपले दादा गेले' अशी प्रतिक्रिया निशब्द भावना प्रत्येकांच्या चेहऱ्यावर उमटली आहे. दोन्ही तालुक्यात बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून दुखवटा पाळण्यात येत आहे.
धुरंदर नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी दुर्दैवी विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण भोर आणि राजगड तालुक्यात शोककळा पसरली आहे. नसरापूर ( ता. भोर ) येथील नसरापूर व्यापारी संघटनेच्या वतीने तातडीने बंदची हाक देताच अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठा बंद करून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तर दोन्ही तालुक्यात हीच परस्थिती निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसह राजकीय विरोधक पक्षातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रत्येकांच्या डोळ्यातून अश्रू देखील तरळले असल्याचे चित्र दिसून येत आहे. अजितदादा पवार जलसंपदा राज्यमंत्री पासून सहा वेळा उपमुख्यमंत्री कार्यकाळ राहिला. या काळात पवार यांनी राज्यसह पुणे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. गृह खाते, कृषी, क्रीडा, शैक्षणिक, सहकार यासह अनेक विकासकामाच्या गातील देण्याचे काम केल्याचे अनेक आठवणींना उजाळा नागरिकांच्या शब्दरूपी प्रतिक्रिया मधून उमटत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विकासकामांना चालना दिली तर पालकमंत्री म्हणून पुणे जिल्ह्यात अनेक स्मरणात राहील अशी विकासकामे केली आहेत. अजित पवार यांच्या निधनाने ' आता आपण पोरके झालो आहोत' असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात उमटत आहे.
फोटो : नसरापूर ( ता. भोर ) येथे बाजारपेठ बंदची हाक देताना नसरापूर व्यापारी आणि ग्रामस्थ; इन्सॅटमध्ये बंद बाजारपेठ