

रत्नागिरी : आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि माझ्यासाठीही अत्यंत दुःखद आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या समोर मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली, ते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत, ही बाब मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या पावन स्मृतीस मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उदय सामंत यांनी भावना व्यक्त केल्या.
उदय सामंत म्हणतात, माझे आणि अजित पवारांचे संबंध हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर ते आपुलकीचे, घरगुती स्वरूपाचे होते. अनेक वेळा ते माझ्यावर रागावायचेही; मात्र तो रागसुद्धा आपुलकीतूनच असायचा. खेळीमेळीच्या वातावरणात आमच्या चर्चा होत, ते हक्काने एखादे काम सांगायचे, मार्गदर्शन करायचे आणि योग्य वेळी स्पष्ट शब्दांत मत मांडायचे हेच त्यांचे रोखठोक नेतृत्व होते.
मंगळवारी संध्याकाळी पुणे एमआयडीसीच्या विकासकामांबाबत आमचे फोनवरून सविस्तर बोलणे झाले होते. परंतु आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच मला प्रचंड धक्का बसला. हा आघात शब्दांत व्यक्त करणे अशक्य असल्याचे सामंत यांनी सांगितले.
माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अजितदादांनी मला खूप सहकार्य केले, पाठिंबा दिला. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, अजितदादांनी मला संपूर्ण महाराष्ट्र फिरण्याची संधी दिली. आणि यामुळेच माझा चेहरा राज्यभर ओळखीचा झाला. माझ्या राजकारणातील गेल्या २५ वर्षात त्यांनी मला मार्गदर्शन, पाठिंबा आणि विश्वास दिला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
उद्योग मंत्री झाल्यानंतर प्रशासन कसे चालवावे, निर्णय कसे घ्यावेत, याबाबतही दादांनी अनेक वेळा मला मार्गदर्शन केले. माझ्या राजकीय आयुष्यातील पहिली १५–२० वर्षे मी त्यांच्या सोबत काम केली आणि त्यामुळेच आज त्यांच्या जाण्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख झाले आहे.
अजितदादांचे जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात निर्माण झालेली एक मोठी पोकळी आहे,जी कधीही भरून येऊ शकणार नाही, असे उदय सामंतांनी म्हटले आहे.