

बाणेर: महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8,बाणेर, सूस, म्हाळुंगे येथील राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या भाजपाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार आणि राज्यात सुसंगत सरकार असताना विकासासाठी निधीची कमतरता कधीच नव्हती, मात्र स्थानिक पातळीवर अपयशी कारभारामुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पवार म्हणाले की, मागील काही वर्षांत पुणे महापालिकेतील कारभाऱ्यांनी शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते, खड्डे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, पाणीपुरवठ्याची अनियमितता आणि वाढते प्रदूषण यामुळे पुण्याची ओळखच धोक्यात आली आहे. जागतिक सर्वेक्षणात ट्रॅफिकच्या बाबतीत पुणे चौथ्या क्रमांकावर आहे, ही बाब प्रशासनाच्या अपयशाचे द्योतक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर पवार यांनी विशेष भर दिला. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मुलांसाठी दर्जेदार महापालिका शाळा, सीबीएससी पॅटर्न आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आधुनिक रुग्णालये आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “आरोग्य व शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. तो हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी पवार यांनी स्थानिक नेतृत्वाचे कौतुक करत बाबूराव चांदेरे आणि अमोल बालवडकर यांनी या भागात सातत्याने विकासकामे केल्याचे सांगितले. सामाजिक, आरोग्य व नागरी प्रश्नांवर चांदेरे आणि बालवडकर नेहमीच नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले असून त्यांचे काम जनतेला दिसत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महानगरपालिकेत परिवर्तन घडवायचे असेल तर सक्षम, काम करणारे आणि जबाबदार कारभारी आवश्यक आहेत, असे सांगत अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक 8 व 9 मधील उमेदवारांना घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. “जनतेने संधी दिली तर पुण्याचा चेहरा बदलण्याची जबाबदारी माझी आहे. मी शब्दाचा पक्का असून काम करून दाखवतो,” असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
विजयी संकल्प सभेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सभेतील वातावरण उत्साही असून अजित पवारांच्या भाषणाला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. या वेळी प्रभाग आठ व नऊचे उमेदवार गायत्री मेढे कोकाटे, पार्वती निम्हण, बाबूराव चांदेरे, अमोल बालवडकर, प्रकाश ढोरे, अर्चना मुसळे, पोर्णिमा रानवडे, विनोद रणपिसे आदी उपस्थित होते.