

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : विश्रांतवाडी ते विमानतळ रस्त्यावरील हॉटेल व दुकानांसमोरील अनधिकृत पत्र्याचे शेड व इतर अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या अंतर्गत सुमारे आठ हजार स्क्वेअर फुटांवरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. जी : 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे बांधकाम विभाग चारच्या अधिकार्यांनी सांगितले. विश्रांतवाडी चौकापासून विमानतळकडे जाणार्या दुकानांसमोरील अनधिकृत पत्र्याच्या शेडवर दिवसभर कारवाई सुरू होती.
तुलसी हॉटेल, जोशी वडेवाले, सृष्टी गार्डन, शारदा हॉटेल, गर्ग पेढी आदी दुकानासमोरील अतिक्रमणे या वेळी काढण्यात आली.
तसेच फाईव्ह नाईन चौकात रस्त्यावर असलेल्या पत्रा शेड व पान टपरीवर कारवाई करण्यात आली. यापुढेदेखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. उपअभियंता एकनाथ गाडेकर, कनिष्ठ अभियंता फारुख पटेल, कनिष्ठ अभियंता क़श्यप वानखेडे, सहायक पराग गोरे, अतिक्रमण विभागाचे पोलिस निरीक्षक राजू अडागळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.