पुणे: राज्यात ऊस क्षेत्र मोठे असले तरी साखर कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध नाही. त्यामुळे एकरी ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या तंत्रज्ञानाच्या वापर हेच उत्तर आहे. ‘एआय’मुळे ऊस पिकासह शेतीचे अर्थकारण बदलून शेतकर्यांचे जीवनमान सुधारणार असल्याचा विश्वास माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशातील काही कारखान्यांकडून साखरेबरोबरच इथेनॉल, कापड असे उपपदार्थही तयार केले जातात. त्यामुळे आपल्या कारखान्यांनी साखरेव्यतिरिक्त अन्य उपपदार्थ तयार करण्यास प्राधान्य द्यावे. (Latest Pune News)
तसेच, एआय तंत्रज्ञान ऊस शेतीमध्ये गेमचेंजर ठरणार असल्याने त्याच्या प्रसारासाठी राज्य सहकारी साखर कारखाना संघ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), राज्याच्या कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्रानीही महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
मांजरीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) मुुख्यालयात सोमवारी (दि.9) झालेल्या चर्चासत्रात व्हीएसआय संस्था आणि बारामतीतील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यामध्ये ऊस शेतीत एआय वापरावर सामंजस्य करार करण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ व वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांनीही संयुक्तपणे आयोजनात सहभाग घेतला. त्यावेळी पवार अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, व्हीएसआयचे विश्वस्त आमदार जयंत पाटील, नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, सतेज पाटील, रोहित पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त दीपक तावरे, साखर आयुक्त सिध्दाराम सालिमठ आणि व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, शेतकी अधिकारी, शेतकरी, जिल्हा बँकांच्या प्रतिनिधींनी चर्चासत्रात सहभाग घेतला.