पुणे : शेतजमिनीचा वाद 70 वर्षांनंतर निकाली; चौथ्या पिढीतील युवकांनी मिटवला वाद

पुणे : शेतजमिनीचा वाद 70 वर्षांनंतर निकाली; चौथ्या पिढीतील युवकांनी मिटवला वाद
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शेतजमीन आणि वाद हे समीकरण ठरलेलंच. भावाला पाच मुलीनंतर एकही मुलगा नसल्याने वंश वाढण्यासाठी दुसर्‍या भावाने आपला एक मुलगा दत्तक म्हणून देण्याचे ठरले. मात्र, त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न होताच दोन्ही भावांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढच्या पिढीमध्ये जमीन वाटपाबाबत 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षांनंतर लोकन्यायालयात मिटला.

कुटुंबीयांच्या बैठका, समुपदेशन यासह चौथ्या पिढीच्या तरुण युवकांनी वाद मिटण्यासाठी घेतलेला पुढाकार हा महत्त्वाचा ठरला. पूर्व हवेली तालुक्यातील कदम वाकवस्ती गावातील नावाजलेले धावजी पाटील (सर्व नावे बदललेली आहेत) कुटुंबात सयाजी आणि पिराजी हे दोन सख्खे भाऊ. यामध्ये, थोरला भाऊ असलेल्या सयाजीला पाच मुली व धाकट्या पिराजीला दोन मुले होती.

पिराजी याने एक मुलगा सयाजीला दत्तक देण्याचे ठरवले. कालांतराने पाच मुलींसह दोन मुलांचीही लग्न झाली. मात्र, दोन भावांमधील मुल दत्तकबाबतची कायदेशीर प्रक्रिया राहून गेली. यादरम्यान, सयाजी व पिराजी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, सन 1954 पासून दोन्ही भावाच्या कुटुंबांमध्ये शेतजमिनीवरून वाद-विवाद सुरू झाले. वादामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये वितुष्ट निर्माण झाले.

शेतजमीन वादाच्या 70 वर्षांत कुटुंबाच्या चौथ्या पिढीची संख्या 160 पर्यंत पोहोचूनही कुटुंबीय एकदुसर्‍याशी कोणी बोलत नव्हते. यादरम्यान, दोन्ही कुटुंबीयांनी न्यायालयात एकमेकांविरोधात वाटपाचा दावा दाखल केला. शेतजमिनीचा वाद लोकन्यायालयात आल्यानंतर अ‍ॅड. वैभव धायगुडे-पाटील यांनी त्यामध्ये, कुटुंबीयांच्या 23 बैठका घेत समुपदेशन केले.

त्यानंतर कुटुंबातील चौथ्या पिढीतील तरुण सदस्यांनी पुढाकार घेऊन ज्येष्ठांची समजूत काढली.त्यानंतर वाद लोकन्यायालयात निकाली निघाला. याप्रकरणात अ‍ॅड. संदीप कुडते, अ‍ॅड. शरद आखाडे, अ‍ॅड. प्रतीक्षा कांबळे आणि अ‍ॅड. बलराज सपाटे यांनी कामकाज पाहिले.

दत्तकबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा वाद निर्माण झाला. समुपदेशनादरम्यान, कुटुंबातील सदस्यच एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ, श्रम आणि पैसा वाया न घालवता सामंजस्याने वाद मिटविण्याचा सल्ला दिला. तरुण पिढीसह ज्येष्ठांनाही ते पटल्याने अखेर लोकन्यायालयात हा वाद निकाली निघाला.
                                              – अ‍ॅड. वैभव धायगुडे-पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news