मराठवाडा, विदर्भातील शेतमजूरांची कामांसाठी जुन्नर तालुक्याकडे कूच !

मराठवाडा, विदर्भातील शेतमजूरांची कामांसाठी जुन्नर तालुक्याकडे कूच !

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील शेतशिवारात सध्या गावरान कांद्याच्या काढणीसह इतर कामांची लगबग सुरू आहे. ही शेतीकामे उपलब्ध होत असल्याने मराठवाडा व विदर्भातील मजूर जुन्नर तालुक्यात स्थलांतरित होऊ लागले आहेत. तालुक्यात असलेली 5 धरणे व नद्यांच्या लाभक्षेत्रात पाण्याची उपलब्धता ही वर्षभर होत असल्याने नगदी पिके तसेच फळबागांचे क्षेत्र हे मोठे आहे. तालुक्यात खरीप व रब्बी हंगामाखालील क्षेत्र हे अधिकचे आहे. रब्बी हंगामात तालुक्यात कांदा व उन्हाळ्यात टोमॅटो, फुलांच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर होतात. शेतकर्‍यांना यामुळे मजुरांची गरज भासते.

तालुक्यात शेती कामे उपलब्ध होत असल्याने ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर तसेच नगर जिल्ह्याच्या अकोले व जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी शेतमजूर हे नेहमीच कामासाठी येतात. शेतातील ओतूर, बनकरफाटा, जुन्नर, नारायणगाव व आळेफाटा येथे शेतकामे मिळवण्यासाठी शेतमजूर नेहमीच येत असतात. मात्र आता मराठवाडा व विदर्भातील हिंगोली, वसमत, वाशीम, यवतमाळ व इतर जिल्ह्यांतील शेतमजूरही आळेफाटा येथे उन्हाळ्याच्या सुरुवातीस कामाच्या शोधार्थ गेल्या काही वर्षांपासून येत आहेत. तालुक्यात सध्या गावरान कांदा काढण्याची व इतरही कामे सुरू असल्याने आदिवासी शेतमजूर मोठ्या संख्येत येत आहेत. या शेतमजुरांच्या जोडीला प्रतिदिवशी 800 ते 900 रुपये दराने मजुरी दिली जात आहे. ज्यांना मजूर हवे असतात ते या मजुरांना घेऊन आपल्या शेतात नेतात. ज्यांच्याकडे काम असते त्यांनी या मजुरांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करायची असे येथे ठरवले जाते.

आमच्याकडील कामे संपली : मजूर

आमच्याकडे सोयाबीन, तूर काढणी व कापूस वेचणीची कामे पूर्ण झाल्याने त्या भागात शेती कामे उपलब्ध नसतात. आम्हाला बागायती क्षेत्र असलेल्या जुन्नर तालुक्यात सध्या कामे मिळत असल्याने आम्ही आळेफाटा येथे आलो असल्याचे कुंडलीक सोनटक्के (रा. पिंपळगाव, वाशीम), संदीप ठाकरे, अशोक उगले (रा. पुसद, यवतमाळ) व रसिक सय्यद (रा. जालना), भानुदास चव्हाण (रा. वाशीम) या मजुरांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news