कृषी निविष्ठांच्या तपासणीची मोहीम; अप्रमाणित नमुने आढळल्यास कारवाई

कृषी निविष्ठांच्या तपासणीची मोहीम; अप्रमाणित नमुने आढळल्यास कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी व त्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठांचा योग्य मालाचा पुरवठा होण्यासाठी निविष्ठांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील यांनी दिली. एकूण 36 हजार नमुने काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून अप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार आहे.

बियाणांचे 20 हजार, खतांचे 10 हजार आणि कीटकनाशकांचे सहा हजार नमुने तपासण्याचे उद्दिष्ट निश्चित करून काम सुरू झालेले आहे. अनुदानित युरिया खताचा गैरवापर औद्योगिक कारणास्तव होऊ नये म्हणूनही उपाययोजना केल्या जात असून युरियाच्या टॉप-20 खरेदीदारांची तपासणीही क्षेत्रीय स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, निविष्ठांच्या तपासण्यासाठी राज्यभरात 350 भरारी पथके कार्यान्वित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

परराज्यातून येणार्‍या बनावट खतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, सर्व खत कंपन्यांचे नमुने सम प्रमाणात काढण्यासाठी निरीक्षकनिहाय नमुने काढण्याचे उद्दिष्टही देण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये अवैध पद्धतीने बनावट खतेनिर्मिती करणार्‍या उद्योगांवरही नजर ठेवण्यात येत आहे. खत कंपन्यांना युरिया खताच्या रेल्वे रेकची आगाऊ कल्पना देण्यासंदर्भात सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

युरिया खताचे वितरण होण्यापूर्वी ज्या किरकोळ विक्रेत्याकडे युरिया खताचा पुरवठा होणार आहे, त्यांची यादी देण्याबाबत कंपन्यांना सक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे युरियाचा पुरवठा झाला आहे किंवा नाही याचीही तपासणी क्षेत्रीय कर्मचारी करतील.
ज्या औद्योगिक कारणास्तव युरिया वापरला जातो त्या औद्योगिक युनिटची तपासणी होईल. मिश्र खतांच्या कारखान्यामध्ये युरिया खताचा वापर योग्य प्रमाणात होतो किंवा नाही याचीही तपासणी होईल. (समाप्त)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news