हिंजवडीतील 37 कंपन्या वाहतूक कोंडीमुळे गेल्या : आ. रवींद्र धंगेकर

हिंजवडीतील 37 कंपन्या वाहतूक कोंडीमुळे गेल्या : आ. रवींद्र धंगेकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील वाहतूक कोंडीला कंटाळून हिंजवडी आयटी पार्कमधून 37 कंपन्या पुण्याबाहेर आणि राज्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे पोलिस आणि महापालिकेने वाहतूक कोंडीवर युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. हिंडवडी आयटी पार्कमधील कंपन्यांसंदर्भात माध्यमांशी बोलताना आ. धंगेकर म्हणाले की, हिंजवडी आयटी पार्कमध्ये अनेक नामवंत कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होणार नाही, याकडे पोलिसांनी आणि महापालिकेने गांभीर्याने पाहिले नाही.

त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल 37 कंपन्या पुण्याबाहेर हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई येथे गेल्या आहेत. आणखी काही कंपन्या पुण्याबाहेर स्थलांतरित होण्याचा विचार करीत आहेत. पण, राज्याच्या उद्योगमंत्र्यांना याची काहीही माहिती नाही, हे सरकारचे दुर्दैव आहे.
गेल्या दहा वर्षांत पुणे शहराच्या पायाभूत सुविधांवर नीट नियोजन करून कामे केली नसल्यामुळे सगळे परिणाम आज आपल्याला भोगायला लागत आहेत. सर्वसामान्य माणसाला सकाळी घरून ऑफिसला जायला दोन-दोन तास लागत आहेत. तर, ऑफिसमधून घरी येतानासुद्धा तेवढाच कालावधी लागत आहे. त्यामुळे कामाचा निम्मा वेळ प्रवसात जात आहे. पुणेकरांची जीवनशैली सुसह्य करण्यासाठी पालिकेने, वाहतूक पोलिसांनी कार्यरत राहायला हवे. पुढच्या 40-50 वर्षांचे नियोजन करून काम करायला हवे. याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेच अनेक प्रश्न उद्भवल्याचे आ. धंगेकर यांनी सांगितले.

 हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news