शाळकरी मुलीच्या मृत्यूनंतर इंदापूरचे पोलिस झाले जागे

शाळकरी मुलीच्या मृत्यूनंतर इंदापूरचे पोलिस झाले जागे

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर शहरातून जाणार्‍या जुन्या पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने व बेशिस्त पार्किंगमुळे अपघातामध्ये एका मुलीला शनिवारी (दि.10) आपला जीव गमवावा लागल्यानंतर शहरातील या समस्येवर नागरिकांकडून जोरदार टीका झाल्याने पोलिसांनी खडबडून जागे होत रविवारी (दि.11) बेशिस्त व अवजड वाहनांवर कारवाईस सुरुवात केली आहे.

केवळ पोलिस प्रशासनाने कारवाई करून फरक पडणार नसून नगरपरिषद, परिवहन विभाग (आरटीओ),सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील प्रशासन यांनी संयुक्तिक कारवाई करणे गरजेचे असून याशिवाय शहरातील अवजड व बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न सुटणार नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

रविवारी इंदापूर शहरात नगरपरिषदेच्या प्रांगणात आठवडे बाजार असतो. या जुन्या राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी नारायणदास रामदास हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बसस्थानक, पंचायत समितीचे कार्यालय, दिवाणी व फौजदारी न्यायालय, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, अनेक पतसंस्थांची कार्यालये, व्यावसायिक दुकाने मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरात नागरिक, विद्यार्थी यांची नेहमीच गर्दी असते.

शहरातील व बाहेरगावाहून बाजारासाठी व कामानिमित्त आलेले नागरिक याच रस्त्यावर आपल्या मोटारसायकली व चारचाकी वाहने बेशिस्तपणे वाहतुकीला अडथळा होईल असे लावून आपली कामे करत असतात. तर सध्या ऊस गळीत हंगाम सुरू असल्याने उसाने भरलेल्या भरगच्च दोन ट्रॉली ट्रॅक्टर तसेच मोठे ट्रक हे बाह्यवळणाचा वापर न करता शहरातून वाहतूक करत असतात.

ऊस वाहतुकीला तरी किमान वर्दळीच्या शालेय परिसरातून बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत आहे. पोलिस प्रशासनाने रविवारी कारवाई करत बारा मोटारसायकलींवर कारवाई केल्याची माहिती इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर व त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जप्त करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news