प्रशासनाच्या आश्वासनानंतर देहूतील उपोषण मागे

प्रशासनाच्या आश्वासनानंतर देहूतील उपोषण मागे

देहूगाव : श्रीक्षेत्र देहूगावमध्ये तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येणार्‍या लाखो वारकरी भाविक भक्तांच्या राहण्यासाठी गायरान जमीन आरक्षित ठेवण्यात यावी यासह अन्य मागणीसाठी सुरू असलेले श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे उपोषण तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्;यात आले.

तीर्थक्षेत्र देहूतील गायरान जमीन वाचविण्याच्या मागणीसाठी संस्थानचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे उपोषण सुरू होते. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास देहूतील लोकप्रतिनिधी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांची विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात येईल, असे तहसीलदार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. परंतु, ही बैठक कधी घेणार याचा पत्रात उल्लेख नव्हता.

त्यामुळे शासनस्तरावर या संदर्भातील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांनी पत्र देण्यात आल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. खासदार श्रींरंग बारणे, आमदार सुनील शेळके, उपविभागीय अधिकारी संजय असवले यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना शरबत देण्यात आले. या वेळी देहू नगरपंचायतीचे नगरसेवक, महसूल विभागातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

गायरान जागा वारकर्‍यांसाठी देण्याची मागणी

श्रीक्षेत्र देहूगावमध्ये तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येणार्‍या लाखो वारकरी भाविक भक्तांच्या राहण्यासाठी गायरान जमीन आरक्षित ठेवण्यात यावी, वारकरी संत विद्यापीठासाठी निर्माण करावे, संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा, तुकाराम बीज, कार्तिकी यात्रा, आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी येणार्‍या भाविकांच्या राहुट्या आणि वाहन तळासाठी जागा ठेवावी, अद्यावत ग्रामीण रुग्णालय आणि जल शुद्धीकरण केंद्र तयार करावे, एमएसईबीच्या सब स्टेशन तसेच घन कचरा व्यवस्थापन, मैदान, गावजत्रा, नगरपंचायत प्रशकीय इमारत,अग्निशामक केंद्र, स्मशान भूमीसाठी जागा आरक्षित ठेवण्याच्या मागणीसाठी संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तममहाराज मोरे, संजयमहाराज मोरे, नगराध्यक्ष पूजा दिवटे, स्मिता चव्हाण, योगेश परंडवाल, प्रवीण काळोखे, स्वप्निल काळोखे, प्रकाश काळोखे, प्रशांत काळोखे हे मुख्य मंदिरासमोर उपोषणास बसले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news