वडगाव मावळ : मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ओबीसी सेल पाठोपाठ युवकच्या तालुकाध्यक्षपदी विशाल वहिले यांची नियुक्ती करून युवक आघाडी सक्रिय करण्याचा प्रयत्न केला असून, आता पक्षाचा तालुकाध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता
लागली आहे.
पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट व अजित पवार गट अशी फूट पडली आणि राज्यभर दोन्ही गटांच्या पदाधिकार्यांच्या नेमणुकाही झाल्या. दरम्यान, मावळ तालुक्यातही शरद पवार गट सक्रिय होणार असल्याच्या चर्चा सुरुवातीच्या काळात दबक्या आवाजात सुरू होत्या. परंतु, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यातील विकासकामांसाठी अजित पवार यांनी दिलेला भरघोस निधी व आगामी काळात रखडलेली तसेच नवीन विकासकामे व्हावीत, या उद्देशाने थेट अजित पवार यांना साथ दिली.
तसेच, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, बबनराव भेगडे यांनीही वडगाव मावल येथे झालेल्या बैठकीत अजित पवारांसोबत राहण्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे मावळ तालुक्यात राष्ट्रवादी एकसंध राहील व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करेल अशी खात्री झाली असताना काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते असलेले वडगाव मावळ येथील युवा कार्यकर्ते अतुल राऊत यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली व राऊत यांच्या रूपाने मावळात शरद पवार गटाने पाय ठेवला.
त्यानंतर जिल्हा सरचिणीसपदी सुनील शिंदे, ओबीसी सेल तालुकाध्यक्षपदी किसन कदम यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या. गुरुवारी युवक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी विशाल वहिले यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. त्यामुळे शरद पवार गटाने ओबीसी सेलच्या माध्यमातून पाऊल टाकून युवक आघाडीच्या माध्यमातून पुढील चाल सुरू केले असल्याचे दिसते. दरम्यान, अजूनही शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष हे प्रमुख पद रिक्त असून, या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून कार्यरत असणारे जवळपास सर्वच नेते अजित पवार यांच्या पाठीशी असल्याने शरद पवार गटाच्या गळाला आता तालुकाध्यक्ष पदाला शोभेल असा कोणता सक्षम कार्यकर्ता लागणार, याचीच चर्चा तालुक्यात सुरू आहे.
हेही वाचा