

बावडा(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : भोडणी येथे देशाच्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण सारिका सुरेश जगताप (रा. भोडणी) या नववधूच्या हस्ते गुरुवारी (दि. 26) करण्यात आले. ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर नववधू लग्नसमारंभासाठी लासुर्णेकडे (ता. इंदापूर) वर्हाडी मंडळींसह रवाना झाली. सारिका जगताप हिचे सचिन पार्लेकर (रा. लासुर्णे) यांच्याशी लासुर्णे येथील निळकंठेश्वर मंगल कार्यालयामध्ये दुपारी 12 वाजता लग्न होते.
लासुर्णेकडे सकाळी हळदीला जाण्यासाठी जगताप कुटुंबीय, वर्हाडी मंडळींची गडबड चालू असतानाही सारिका जगताप हिने देशहित हे वैयक्तिक हितापेक्षा महत्त्वाचे समजून ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण केले. या वेळी सरपंच धनश्री जगताप, उपसरपंच मल्हारी लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष जगताप, शिक्षक, मुख्याध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते. ध्वजारोहण आटोपताच नववधू सारिका जगताप हिने लासुर्णेकडे लग्नासाठी वर्हाडी मंडळींच्या लवाजाम्यासह प्रस्थान केले.