Ashadhi Wari 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट… गर्दीने गजबजला दिवे घाट

Ashadhi Wari 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट… गर्दीने गजबजला दिवे घाट

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  विठ्ठल भेटीची ओढ… 'माउली-माउली'चा जयघोष करीत… खांद्यावर भगव्या पताका घेतलेल्या वारकर्‍यांची संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसह दिवे घाट बुधवारी सायंकाळी पार केला. पाऊस नसला तरी ढगाळ हवामान, घाटाच्या कडेला पसरलेली हिरवाई, अशा वातावरणात पांढरेशुभ्र कपडे परिधान केलेल्या वारकर्‍यांची मांदियाळी घाटरस्त्यावरून मार्गस्थ होत असताना तेथील वातावरण भक्तिमय बनून गेले होते. घाट पार करून पालखी सोहळा सासवडला मुक्कामी पोहोचला.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा दोन दिवसांच्या पुण्यातील मुक्कामानंतर बुधवारी सकाळी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा रथ सकाळी सव्वासहाच्या सुमारास भवानी पेठेतून निघाला. हा सोहळा सव्वाआठच्या सुमाराला हडपसर परिसरात पोहोचल्यानंतर, नऊच्या सुमाराला हडपसर गाडीतळ येथे विसावला. हडपसर, मांजरी आणि लगतच्या परिसरातील भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी येथे गर्दी केली होती.

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नाना पेठेतून सकाळी निघाल्यानंतर, दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला हडपसर गाडीतळ येथे विसाव्यासाठी थांबला. त्यानंतर संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोलापूर रस्त्याने लोणीच्या दिशेने मार्गस्थ झाला. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा फुरसुंगी-भेकराईनगर येथून दुपारी बाराच्या सुमारास उरुळी देवाची फाट्यावर पोहोचला. तेथे विसाव्याच्या ठिकाणी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. वडकीनाला या ठिकाणी पालखी दुपारी दीडच्या दरम्यान पोहोचली. तेथे दुपारची विश्रांती घेतल्यानंतर पालखी सोहळा दिवेघाटाच्या दिशेने मार्गस्थ झाला.

माउलींचा रथ सायंकाळी चारच्या सुमाराला घाटाच्या पायथ्याशी पोहोचला. त्यापूर्वीच वारकर्‍यांनी दिवे घाटाची चढण चढण्यास प्रारंभ केला होता. वारकर्‍यांच्या गर्दीने घाटरस्ता फुलून गेला होता. टाळ-मृदंगाचा गजर करीत भजनात दंग होऊन नाचणारे वारकरी संथगतीने घाटातून सासवडच्या दिशेने निघाले होते. पालखी सायंकाळी पाचच्या सुमाराला दिवेघाटाच्या मध्यावर पोहोचली. संपूर्ण घाट रस्त्यावर केवळ पांढरे वस्त्र परिधान केलेले, भगव्या पताका घेतलेले वारकरी दिसत होते. पालखी दृष्टीच्या टप्प्यात येताच डोंगर माथ्यावर थांबलेल्या भाविकांनी 'माउली-माउली'चा एकच जल्लोष केला.

माउलींच्या दर्शनासाठी घाटमाथ्यावर गर्दी

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सासवड दिवे गावातील ग्रामस्थांसह असंख्य पुणेकर भाविकांनी गर्दी केली होती. काही पुणेकर पुण्यातून सासवडपर्यंत माउलींच्या सोबत पायी वारी करीत गेले होते. उत्साही छायाचित्रकार, रिल्स स्टारची गर्दी
यंदा दिवेघाटातील वारीच्या प्रस्थानाचे आणि निसर्गसौंदर्याची छायाचित्रे टिपण्यासाठी व्यावसायिक, प्रोफेशनल छायाचित्रकारांसह उत्साही छायाचित्रकारांनीही गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यासोबतच रिल्स व्हिडिओ बनविणारे रिल्स स्टारची संख्याही मोठी होती.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news