

शिरूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : केवळ गरिबीमुळे डॉक्टर होता न आलेल्या केंदूर (ता. शिरूर) येथील नानाभाऊ भागुजी साकोरे यांच्या तीनही अपत्यांनी आपल्या वडिलांची अपूर्ण इच्छा पूर्ण तर केलीच, शिवाय धाकटी मुलगी डॉ. मानसी हिने नुकतेच यूपीएससीच्या भारतीय महसूल सेवेच्या (आयआरएस) परीक्षेतही यश मिळविले. या यशाने तिच्यासह संपूर्ण परिवाराचे परिसरात कौतुक होत आहे.
नानाभाऊ साकोरे हे सन 1980 च्या बॅचचे केंदूर येथील हायस्कूलमध्ये सर्वोत्तम गुण मिळवून इयत्ता दहावीत यशस्वी झाले होते. आई-वडील अडाणी आणि घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. नानाभाऊ यांना त्या काळी डॉक्टर व्हायचे होते; पण ना कुणाचे मार्गदर्शन ना दिशा. पर्यायाने अभियांत्रिकीत पदवी घेऊन ते मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेसमध्ये रुजू झाले. त्यांची पहिली मुलगी दीपिका एमबीबीएस झाली, तर लगोलग मानसीही बी.डी.एस. आणि एम.डी.एस. उत्तीर्ण झाली. धाकटा मुलगा जय हादेखील कोल्हापुरातून एम.बी.बी.एस. झाला.
दरम्यान या भावंडांमध्ये डॉ. मानसी ही केवळ डॉक्टर होऊन थांबली नाही, तर तिने मागील वर्षी यूपीएससीच्या विविध परीक्षांसाठी प्रयत्न सुरू केले आणि दुसर्याच प्रयत्नात यावर्षी ती भारतीय महसूल सेवेच्या (आयआरएस) परीक्षेत उत्तीर्ण झाली. आई रंजना आणि वडील नानाभाऊ यांच्यासह मामा रामभाऊ शेटे यांनी प्रेरणा दिली. त्यामुळेच मी वडिलांच्या डॉक्टरकीच्या इच्छेसह आता आयआरएस परीक्षेतही यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया डॉ. मानसीने दिली. मानसीची मोठी बहीण डॉ. दीपिका हिचे पती कृष्णांत पाटील हे आयएएस अधिकारी असून, त्यांनीही मानसीला उत्तम मार्गदर्शन केल्याचे साकोरे परिवाराकडून सांगण्यात आले.