८० च्या पुढे गेला की गुरु मानण्याचा नवा क्रायटेरिया : प्रख्यात दिग्दर्शक डॉ . जब्बार पटेल 

८० च्या पुढे गेला की गुरु मानण्याचा नवा क्रायटेरिया : प्रख्यात दिग्दर्शक डॉ . जब्बार पटेल 
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ८० च्या पुढे गेला की, गुरू माना अन् सन्मान करून बसवा असा क्रायटेरिया आताच्या काळात मानला जात असावं असं वाटत. गुरू अस शब्द उच्चारला की अंगावर काटा उभा राहतो. म्हणून मी कोणाचा गुरू नाही अन मला कोणी शिष्य नाही अशा शब्दांत कोणाचे नाव न घेता दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चौफेर टोलेबाजी केली.

चिंतामणी ज्ञानपीठ च्या वतीने पुण्यातील गणेश क्रीडा मंडळाच्या सभागृहात गुरुजन गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिग्दर्शक जब्बार पटेल, माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, उल्ल्हास पवार, नामवंत बिल्डर रमणलाल लुंकड यांचा गुरुजन गौरव सन्मान अप्पा रेणुसे मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आला. चिंतामणी ज्ञानपीठ च्यावतीने अप्पा रेणुसे यांनी प्रास्ताविक करून विचार मांडले. ते म्हणाले, दक्षिण पुण्यात चिंतामणी ज्ञानपीठ काम करत असून गुरुजनामध्ये बहुतांश महिला गुरूंचा समावेश आहे. शिक्षणाबरोबर खेळातही आमचे ६५ विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय खेळात गेलेले आहेत. गुरुजन सोहळा करण्याचे आमचे अठरावे वर्ष असून जुने संस्कार व संस्कृती नव्या पिढीसमोर कायम रहावा यासाठी संस्था काम करते. पुढील वर्षीच्या गुरूपौर्णिमापूर्वी दक्षिण पुण्यात एमपीएससी ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मोफत अभ्यासिका उभी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सन्मान सोहळ्यात बोलताना डॉ. पटेल पुढे म्हणाले, गुरुजन म्हणून हा माझा पहिला सत्कार आहे. अलीकडच्या काळात जो कोणी ८० च्या पुढे गेला की त्याला गुरू माना अन् सन्मान करून बसवा असे होताना दिसते. गुरू मानने हीच मनातील इच्छा असते, त्यामुळे त्याला अर्थ असतो. गुरू हा नदी सारखा असतो. गुरू कडून काय घ्यायचं हे शिष्याने ठरवायचे असते. शिष्याला जे हवे असते तो ते घेतो अन् मोठा होतो. माझ्या मते, गुरूच्या पुढे शिष्याने जायला पाहिजे. मी कोणाचा गुरू नाही अन मला कोणी शिष्य नाही असे मी मानत आलो असून तसाच प्रवास सुरू आहे.

 संविधान खरे गुरु….
खरे गुरुजन डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. विचार स्वातंत्र्य हे त्यांनी संविधानातून दिले आहे. गुरू पौर्णिमादिवशी संविधान ची आठवण कराल हीच खरी वंदना असेल. कारण संविधान नसते तर आज आपण आपले विचार मांडू शकलो नसतो.

सत्कार मूर्ती मनोगत….

रमणलाल लुंकड
मी कोणाचा गुरू आहे,हा विचार कधीच आला नाही. मी सामाजिक क्षेत्रात काम सुरू केल्याने मला हा सन्मान देण्यात आला असावा असे वाटते. माझी ओळख करून देताना मला माझा जीवन प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला होता. विटांच्या भट्टीपासून पुण्यातील आर के लूंकड हाऊस असे विश्व कसे नावरुपात आले याची आजही माझ्या मनात जाण आहे.

डॉ. अरुण अडसूळ
अप्पा व त्यांच्या मित्र परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो. सम्राट अशोक अंबरीतून जात असताना भगवे वस्त्र परिधान केलेल्याचा थांबवून सत्कार केला. ते भिक्षुक नसून ते गुरू आहेत हीच खरी वंदना आहे. या सत्काराने ऑक्सिजन मिळाले असून नवी ऊर्जा मिळाली आहे. अनौपचारिक शिक्षणाचा प्रसार मुलांवर होत आहेत. नवी शिक्षण पद्धतीत गुरूच्या भूमिकेत येण्याची गरज आहे.

उल्हास पवार

आमच्या वेळच शिक्षण शहाण होण्यासाठी होत तर तुमच्या वेळेचं शिक्षण हुशार होण्यासाठी आहे, असे बाळासाहेब भारदे सांगायचे. त्यावेळी मी यातील फरक विचारला होता. ते म्हणाले होते, हर्षद मेहता हुशार होता म्हणून अडकला. तो जर शहाण असता तर त्याच्यावर तशी वेळच येऊ दिली नसती. जगात वाइट काहीच नाही, आपण कसे पाहतो अन् कसे घेतो यावरच आपला आनंद असतो. आयुष्यात पाहिले गुरू आई वडील असून त्यांना कधीच विसरता कामा नये. विचारांची निष्ठा मी कधीच सोडली नाही. राजकारणात मी ही मोठा होऊ शकलो असतो, अन्याय झाला तरी मी एकनिष्ठ राहिलो.

सन्मान प्रसंगी स्वर वर्षाव

डॉ जब्बार पटेल यांचा सन्मान अप्पा रेणुसे यांनी केला. यावेळी ' तुम आशा, तुम विश्वास हमारे,,, तुम धरती, तुम आकाश हमारे…' गीतांच्या ओळीचे मंजुळ स्वरात गीत वाजत होते. तर हरी जय जय राम कृष्ण हरी…या भक्ती गीतांच्या स्वरात उल्ल्हास पवार यांचा सन्मान करण्यात आला. माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ व रमणलाल लंकड यांचा सन्मान ही टाळ्यांच्या कडकडाटासह मंजुळ संतूर वादनाच्या स्वरात झाला.

 वारकऱ्यांचा आरोग्य सेवक
सन्मान झाल्यानंतर सभागृहातील नागरिकांनी उभे राहून मानवंदना दिली. चंद्ररंग प्रतिष्ठान वतीने वारीतील वारकऱ्यांना मनोभावे आरोग्य सेवा देणारे डॉ देविदास शेलार यांचा उल्हास पवार यांचा सन्मान करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news