

पिंपरी : पक्ष संघटनेचे निष्ठेने काम करणार्या कार्यकर्त्याला पक्षाकडून संधी दिली जाते. मला 25 वर्षांनी का होईना विधान परिषदेचे सदस्य होण्याची संधी मिळाली. माझ्याप्रमाणे इतरांनीही पक्ष संघटनेचे काम करत राहावे. त्यांनाही पक्षाकडून संधी मिळेल, असे मत भाजपच्या नेत्या व आमदार उमा खापरे यांनी गुरुवारी (दि. 23) व्यक्त केले. शहराच्या पहिल्या महिला आमदार झाल्यानंतर शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व पदाधिकार्यांच्या वतीने उमा खापरे यांचे भाजपच्या पिंपरी-मोरवाडी येथील शहर कार्यालयात स्वागत करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. माजी महापौर माई ढोरे, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, महापालिकेतील माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके यांसह माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले, की भाजप पक्षामध्ये प्रथम देशहिताला प्राधान्य दिले जाते. देशहितासाठी काम करणार्या पक्षात आम्ही काम करीत आहोत. पक्षासाठी योगदान देणार्या सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही एक वेगळी उंची मिळते. उमा खापरे यांना पक्षाने आमदारकीची संधी दिली. त्यांच्या माध्यमातून एक चांगले महिला नेतृत्व शहर भाजपला मिळाले आहे. तत्पूर्वी, निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यान चौकापासून भाजप शहर कार्यालयापर्यंत पक्षाच्या वतीने रॅली काढण्यात आली. त्यामध्ये पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.