पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाच्या वाढत्या झळा, निवडणुकांचा ज्वर, यामुळे सध्या वातावरण तापले आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा प्रखर आणि त्रासदायक असल्याने सार्वजनिक कार्यक्रम भर उन्हात घेऊ नयेत, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्च महिन्यात केले होते. मात्र, बहुतांश राजकीय पक्षांकडून हा सल्ला धाब्यावर बसवून राज्यात भर उन्हात सभा आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.
राज्यातील मतदानाचे उर्वरित टप्पे पुढील पंधरा दिवसांमध्ये पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. राज्यातील राजकारण्यांपासून राष्ट्रीय नेत्यांपर्यंत सर्वच दिग्गज नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जात आहेत. सामान्य नागरिक दोन तास आधीपासून सभांच्या ठिकाणी गर्दी करीत आहेत. सध्या सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाच्या झळा बसत आहेत. या पार्श्वभूमीवर खारघरसारख्या घटना घडू नयेत, यासाठी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
राज्यात मार्च महिन्यापासून तापमान वाढायला सुरुवात झाली. आता वाढत्या तापमानाचे उच्चांक गाठले जात आहेत. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून काळजी घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. दुपारच्या वेळी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे टाळावे, सकाळी लवकर किंवा संध्याकाळी कार्यक्रम आयोजित करावेत, दुपारी कार्यक्रम आयोजित करायचे असल्यास उपस्थित राहणार्या लोकांसाठी मंडपाची आणि पुरेशा पाण्याची व्यवस्था करावी, असे नमूद करण्यात आले आहे.
उमेदवारांच्या प्रचाराला आणि निवडणूक रॅली आणि सभांना वेग आला असताना आरोग्य विभागाच्या सूचनांचे उल्लंघन होत आहे. सभांशिवाय घरोघरी जाऊन प्रचार मोहीम अखंडपणे सुरूच आहे. सभांसाठी दिग्गज नेते आलिशान वातानुकूलित गाडीतून येतात, भाषणे करतात आणि निघून जातात. मात्र, सभांचे नियोजन करणारे कार्यकर्ते आणि सभांना गर्दी करणारे मतदार यांचे उन्हामुळे हाल होतात. त्यामुळे सभांच्या ठिकाणी मोठा मंडप आणि पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असे आरोग्य विभागाकडून सुचविण्यात आले आहे.
आम्ही राजकीय पक्षांना किंवा निवडणूक आयोगाला कोणताही सल्ला किंवा सूचना देऊ शकत नाही, तथापि, दुपारच्या वेळेत मोठ्या प्रमाणात मेळावे घेऊ नयेत, असे आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रम सकाळी किंवा संध्याकाळी घ्यावेत. दुपारच्या वेळी कार्यक्रम आयोजित केले असतील, तर प्रशासनाने मंडप आणि पाण्याची योग्य व्यवस्था करावी.
– डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा (पुणे विभाग)
हेही वाचा