

संतोष शिंदे :
पिंपरी : मागील काही वर्षांपासून आर्थिक फसवणुकींच्या गुन्ह्यात कमालीची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अपर पोलिस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई हे स्वतंत्र पद निर्माण करण्यात आले. त्यांच्याकडून पिंपरी-चिंचवडसह राज्यभरात घडणार्या महत्त्वाच्या आर्थिक घोटाळ्यांचा नियमित आढावा घेतला जात आहे. त्यामुळे संबंधित गुन्ह्यांचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.
पिंपरी- चिंचवड शहर परिसरातदेखील फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यातील महत्त्वाचे व तीन कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक असलेले 43 गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहेत. यामध्ये कोट्यवधी रकमेची फसवणूक झाली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
आर्थिक गुन्हे शाखेचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी उत्साही अधिकार्यांची नेमणूक करावी, महासंचालक कार्यालयाकडून याबाबतचे परिपत्रक घटक प्रमुखांना देण्यात आले आहे. यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेला योग्य ते मनुष्यबळ व साधन सामग्रीदेखील उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहर परिसरात दाखल होणार्या 17 प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती महासंचालक कार्यालयाकडून घेतली जाते. यामध्ये कंपन्यांचा कायदा, सहकारी कायदा, पतसंस्था, बँका, शिक्षण संस्था, नोकरीच्या बहाण्याने, घरबांधणीच्या नावे, मल्टिलेवल मार्केटिंग, शेअर्स, बँक व्यवहार, कर चुकवेगिरी, जमीन खरेदी-विक्री, परदेशातील आयात निर्यात, बनावट किमती दस्तावेज, क्रिप्टो करन्सी, बिटकॉइन, महाराष्ट्रात ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय व्यवसाय/ व्यापाराच्या नावे फसवणूक यांचा समावेश आहे.
पिंपरी- चिंचवड शहर परिसरातील आर्थिक घोटाळ्यांची व्याप्ती लक्षात घेत आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकार्यांचे मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. सध्या आर्थिक गुन्हे शाखेत तब्बल 15 अधिकारी आणि 18 कर्मचारी नियुक्त आहेत. एवढया मोठ्या संख्येत अधिकारी असलेला हा एकमेव विभाग आहे.
नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेतील 22 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे गुन्हे शाखेने कर्जदार यांच्यासह कर्ज उपसमिती सदस्य व बँकेच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कर्जदार आरोपी यांनी आपसात संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी कर्ज प्रकरणामध्ये तारण गहाण मिळकतीचे बनावट मूल्यांकन अहवाल तयार केला. या अहवालाच्या आधारे आधारे कर्ज उपसमिती आणि संचालक मंडळाच्या सदस्यांनी बँकेची 22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सेवा विकास बँकेच्या संचालक मंडळाने बोगस कर्जवाटप करून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. सेवा विकास बँकेच्या पदाधिकार्यांवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत. सेवा विकासच्या घोटाळ्यांची व्याप्ती लक्षात घेता त्यासाठी एसआयटीदेखील स्थापन करण्यात आली होती.
आनंद सहकारी बँकेत 74 कोटींचे गैरव्यवहार
चिंचवड येथील आनंद सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने कर्ज वाटपात घोळ करून बँकेची तब्बल 74 कोटी 24 लाख 62 हजार 862 रुपयांची फसवणूक झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात बँकेच्या संचालक मंडळासह एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फॉरेक्स ट्रेडिंग
फॉरेक्स ट्रेडिंगला भारतात बंदी आहे. मात्र, तरीदेखील काहीजण गुंतवणूक करतात. वाकड पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल आहे. यामध्ये आत्तापर्यंत सुमारे तीस कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आहे आहे.
नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना सावधानी बाळगली पाहिजे. फॉरेक्स ट्रेडिंगसारख्या प्रकारात गेलेले पैसे आणि आरोपी शोधण्यासाठी पोलिसांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. यातील बहुतांश आरोपी बाहेर देशातून हे रॅकेट चालवतात. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.
-मधुकर सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा