

पिंपरी : महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या भरारी पथकाच्या वतीने पालिका भवन, क्षेत्रीय कार्यालय व विविध रूग्णालयांतील अधिकारी व कर्मचार्यांची अचानक उपस्थिती तपासण्यात आली. त्यात तब्बल 235 अधिकारी व कर्मचारी जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, असे संबंधित विभागाप्रमुखांना कळविण्यात आले आहे. कारवाई होणार असल्याने त्या बेशिस्त अधिकारी व कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिकेचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून अधिकारी व कर्मचार्यांनी कार्यालयीन वेळेत नेमून दिलेल्या जागी उपस्थित असणे बंधनकारक आहे. मात्र, काही अधिकारी व कर्मचारी जेवण, नाश्ता व चहा आणि इतर खासगी कारणांसाठी तासन्तास गायब असतात. त्यामुळे दैनंदिन कामांचा खोळंबा होतो. तसेच, नागरिकांना अधिकारी व कर्मचारी न भेटल्याने तक्रारींची संख्या वाढत आहे. त्या तक्रारींची दखल घेऊन सामान्य प्रशासन विभागाच्या भरारी पथकाने पालिका भवनासह सर्व आठ क्षेत्रीय कार्यालय, विविध रूग्णालयांतील वेगवेगळ्या विभागांना अचानक भेटी देऊन तेथील अधिकारी व कर्मचार्यांच्या उपस्थितीची तपासणी केली. त्यात तब्बल 235 अधिकारी व कर्मचारी जागेवर नसल्याचे आढळून आले.
त्यात सहशहर अभियंता, उपसंचालक, वैद्यकीय अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कामगार कल्याण अधिकारी, शल्यचिकीत्सक, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, क्रीडा पर्यवेक्षक, मुख्य लिपिक, लिपिक, उपलेखापाल, आरोग्य निरीक्षक, सहायक भांडारपाल, कॉम्प्युटर ऑपरेटर, सहायक शिक्षक, अनुरेखक, मुकादम, सफाई कामगार, गटराकुली, स्प्रे कुली, मजूर, प्लंबर, शिपाई, सिस्टर इनचार्ज, स्टाफ नर्स, फार्मासीस्ट, आया, वॉर्ड बॉय, वाहनचालक, वायरमन, एएनएम, सर्व्हेअर आदींचा समावेश आहे. जागेवर नसलेल्या या अधिकारी व कर्मचार्यांवर संबंधित विभागाचे प्रमुख कारवाई करणार आहेत.
त्यासंदर्भात सोमवार (दि.15) पर्यंत कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.