

मंचर; पुढारी वृत्तसेवा: गंगापूर बुद्रुक व पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव) येथे दारू विक्री करणार्यांवर घोडेगाव पोलिसांनी कारवाई केली. या दोन्ही कारवाईत 5 हजार 405 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर बुद्रुक गावच्या हद्दीत कृष्णा महादू गायकवाड यांच्या घराच्या पाठीमागे दारू विक्री होत असल्याची माहिती घोडेगाव पोलिसांना कळली होती. याबाबत त्यांनी दोन पंच घेऊन घटनास्थळी छापा मारला असता त्या ठिकाणी राजश्री सतीश लोहोट (वय 35) व सतीश गोपीनाथ लोहोट (वय 40, दोघे रा. गंगापूर बुद्रुक, ता. आंबेगाव) हे दारू विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्या जवळून पोलिसांनी विविध कंपनीची दारू, रोख रक्कम असा एकूण 4 हजार 845 रुपयांचा माल जप्त केला आहे.
तसेच, एका लोखंडी पिंपात गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे 50 लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस जवान नीलेश तळपे यांनी दिली आहे. तपास पोलीस जवान सुरकुले करीत आहेत.
पिंपळगाव घोडे येथे देशी दारूची विक्री केल्याप्रकरणी दीपराज ढमढेरे (रा. पिंपळगाव घोडे, ता. आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याजवळून 560 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस जवान रवींद्र सुरकुले यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलिस जवान कांबळे करीत आहेत.