मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : घोरपडी परिसरातील विजेचे खांब, इमारती व झाडांवर असलेल्या अनधिकृत केबलबाबत दैनिक 'पुढारी'मध्ये नुकतेच वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाने शनिवारी बी. टी. कवडे रोड येथील विद्युत खांबांवरील इंटरनेट केबल काढल्या आहेत.
क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारी मंगला मारतळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद वनवे, सोमनाथ भारती, अतुल जगताप, व्यंकटेश दौडला यांनी ही कारवाई केली. परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडे, रस्ते आणि इमारतींवरून टाकलेल्या धोकादायक अनधिकृत केबलवरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. याबाबत दैनिक 'पुढारी'ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होती. त्यानंतर विद्युत विभागाकडून अनधिकृत केबलवर कारवाई करण्यात आली आहे. परिसरातील अनधिकृत केबलवर यापुढे देखील
कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.