बारामती: तीन दिवसांपासून काळ्या काचा, नंबर प्लेटशिवाय आणि भरधाव वेगाने शहरात भरकटणार्या एका संशयित चारचाकी वाहनाचा अखेर बारामती वाहतूक पोलिसांनी छडा लावला. तीन दिवसांच्या पाठलागानंतर ही गाडी ताब्यात घेऊन संबंधित चालकावर कडक कारवाई करण्यात आली.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे वाहतूक पोलिस सुभाष काळे, प्रशांत चव्हाण, प्रदीप काळे, रूपाली जमदाडे आणि प्रज्योत चव्हाण यांच्यासह काळ्या काचा असलेल्या वाहनांवर 24 मे रोजी कारवाई करीत होते. याच वेळी भिगवण चौकातून काळ्या काचा असलेली आणि नंबर प्लेट नसलेली एक मोटार भरधाव जाताना दिसली. (Latest Pune News)
पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता गाडी वेगाने निघून गेली. सदर गाडी सिटी इन चौकात थांबविण्यासाठी पोलिस निरीक्षकांनी पोलिस स्वाती काजळे यांना कळविले. काजळे यांनीही सिटी इन चौकात गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. पण, गाडी सुसाट गेली. 28 मे रोजी तीच गाडी गांधी चौकात वाहतूक पोलिस सीमा घुले आणि रूपाली जमदाडे यांना दिसली.
त्यांनाही गाडी थांबवता आली नाही. या घटनेची गांभीर्याने दखल घेत निरीक्षक यादव यांनी पोलिस कर्मचारी सुधाकर जाधव आणि अजिंक्य कदम यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच परिसरातील नागरिकांना गाडीबाबत माहिती विचारली. त्याआधारे बारामती शहरातून सदर गाडी शोधण्यात आली.
कृष्णा अभिजित क्षीरसागर (रा. माऊलीनगर-प्रगतीनगर रोड, बारामती) हा चालक सदर गाडी चालवत होता. गाडीचा वाहन क्रमांक चक 06 अन 8555 असा असल्याचे तपासात समोर आले. सदर वाहनावर काळ्या काचा, नंबर प्लेट नव्हती, विमा नव्हता. वाहनचालकावर 3500 रुपयांचा दंड करण्यात आला.
बेदरकारपणे वाहन चालविल्याबद्दल न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. सदर गाडीच्या काळ्या काचा कमी करण्यात आल्या असून, मोठ्या आवाजाची साउंड सिस्टिमसुद्धा काढण्यात आली आहे. सदरची गाडी बारामती वाहतूक शाखेने ताब्यात घेतली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि वाहतूक शाखेच्या पथकाने केली.
बारामती वाहतूक पोलिसांकडून काळ्या काचा आणि कारवाई टाळण्यासाठी अतिशय लहान अक्षरांत वाहन क्रमांक टाकणे अशा वाहनांवर गेल्या पाच दिवसांपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. असे वाहन आढळल्यास 9923630652 यावर कळवावे.
- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक बारामती वाहतूक शाखा