

वारजे : वारजे परिसरातील एका हॉटेलवरील अनधिकृत शेडवर महापालिकेच्या वतीने बुधवारी कारवाई करण्यात आली. या वेळी पाच हजार स्क्वेअर फुटांचे क्षेत्र मोकळे करण्यात आले. बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक तीन आणि वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही कारवाई केली.
वारजे बसस्टॉप येथील एका हॉटेलवर उभारलेल्या अनधिकृत लोखंडी पाइपाची शेड या कारवाईत काढण्यात आली. तसेच महापालिकेच्या ह. भ. प. रामचंद्र पाटलु चौधरी शाळेतील स्वच्छतागृहाच्या जागेवर एका हॉटेल व्यावसायिकाने अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणावरदेखील कारवाई करण्यात आली. एक ट्रक, दोन जेसीबी, दोन गॅस कटर आणि 12 कर्मचार्यांच्या साहाय्याने कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, रूपेश वाघ, अक्षय तोटकर, रोहन कापसे, आकाश गावित,अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी श्रीकृष्ण सोनार यांच्या पथकाने ही कारवाई केली.