

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व ओतूर पोलीस यांनी संयुक्तरित्या कारवाई केली. त्यांच्याकडून ३ लाख १० हजार ३५५ किंमतीचा १८ किलो २५५ ग्रॅम वजनाचा गांजा व ३ लाख ५० हजार किंमतीची गाडी असा ६ लाख ६० हजार ३५५ रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
ऋशीकेश किसन वामन (वय ३२, रा. काळवाडी, ता. जुन्नर) व सतीष अशोक गुंजाळ (वय २६, रा. उंब्रज नं. १, ता. जुन्नर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि. २) स्थानिक गुन्हे शाखेतील पो. हवा. दिपक साबळे व पो. काॅ. अक्षय नवले यांना अहमदनगर ते कल्याण राष्ट्रीय महामार्गवरून एटीओस कंपनीच्या ग्रे रंगाच्या गाडीमधून गांजाची वाहतुक होणार आहे अशी माहिती मिळाली.
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा व ओतुर पोलीस यांनी संयुक्तपणे ओतूर येथील कॉलेजसमोरील रस्त्यावरील गतिरोधकाजवळ सापळा लावून गाडी थांबवून (एमएच ०२ बीआर ८०९०) झडती घेतली. यावेळी वाहनामधील ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही इसमांकडे ३ लाख १० हजार ३५५ किंमतीचा १८ किलो २५५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला याबाबत ओतुर पोलीस स्टेशन येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.ना. संदिप वारे यांचे फिर्यादीवरून एन.डी.पी.एस.कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.