

हिरा सरवदे
पुणे : शहरी गरीब योजनेचे कार्ड काढून देण्याच्या प्रक्रियेत एजंटांची घुसखोरी झाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. अनेक रुग्णालयांच्या बाहेर एजंटांकडून नागरिकांना योजनेचे कार्ड काढून देण्याची गळ घातली जात आहे. त्यामुळे एकाच मोबाईल नंबरवर विविध ठिकाणचे पत्ते असलेल्यांची कार्ड काढण्यात आली आहेत. दरम्यान, यामध्ये रुग्णालयातील कर्मचार्यांचा समावेश आढळल्यास संबंधित रुग्णालयास पॅनेलवरून काढण्याची कारवाई केली जाईल, अशा इशारा महापालिका अधिकार्यांनी दिला आहे.
शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी महापालिकेने 2011 पासून शहरी गरीब योजना सुरू केली.
एक लाख रुपये आर्थिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात. यासाठी महापालिका एक लाख रुपये आर्थिक मदत देते तसेच कॅन्सर रुग्णांसाठी दोन लाख रुपये मदत देते. आतापर्यंत या योजनेचा लाभ लाखो पुणेकरांना झाला आहे. योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि सुसूत्रता आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने योजनेचे डिजिटलायजेशन करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.
मात्र, नवीन कार्डची नोंद करताना एका मोबाईल नंबरवर 25-25 कार्डची नोंद असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात दैनिक 'पुढारी'ने गुरुवारी वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेऊन आरोग्य विभागाने संबंधित मोबाईल नंबर आणि त्या नंबरवर नोंदविलेल्या कार्डवरील पत्ते तपासून शहानिशा केली. त्यामध्ये नागरिकांना एकाच व्यक्तीने कार्ड काढून दिल्याचे निदर्शनास आले आहे. एकाच मोबाईलवर अनेक कार्ड नोंदविल्याचे प्रकार रुग्णालयांच्या परिसरात एजंटांमार्फत काढल्याचा अंदाज आहे.
शहरी गरीब योजनेचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. या प्रक्रियेत एका मोबाईल नंबरवर अनेक कार्डची नोंद झाली आहे. या मोबाईल नंबरची पडताळणी केली जाणार आहे. प्रथमदर्शनी एका नंबरवर वेगवेगळ्या भागांतील नागरिकांची कार्ड काढण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये पॅनेलवरील रुग्णालयातील कर्मचार्यांचा किंवा संबंधित व्यक्तींचा सहभाग आढळल्यास ते रुग्णालय पॅनेलवरून काढून टाकले जाईल शिवाय त्या रुग्णालयाचे बिलही थांबवले जाईल.
– डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका.