नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : वारुळवाडी येथे कॉलेज रोडदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या दुचाकी तथा चारचाकी गाड्यांवर नारायणगाव पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत शाळा व महाविद्यालयामध्ये जाणार्या अल्पवयीन मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. मात्र, या पुढील काळात गाडी चालवण्याचा परवाना नसताना तसेच अल्पवयीन मुले गाडी चालवताना आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिला.
वारुळवाडी या ठिकाणी कॉलेज रस्तादरम्यान बालक मंदिर, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा असल्याने येथे नेहमीच वर्दळ दिसून येते. या रस्त्यादरम्यान ग्रामपंचायतीने पायी जाणार्या नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी फुटपाथ बनवला आहे; मात्र सद्यस्थितीत या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने लावण्यात येतात. परिणामी, शाळेतील मुलांना ने-आण करणार्या गाड्यांना जाण्यासाठी अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत होती. ग्रामपंचायतीने येथे नो-पार्कगिंचे बोर्ड लावले असतानादेखील या ठिकाणी गाड्या लागत होत्या. याबाबतची तक्रार ग्रामपंचायतीने पोलिस ठाण्यात केली होती.
दरम्यान, कॉलेज रोड असल्याने येथून जाणार्या मुलींची संख्या जास्त आहे. त्यामुळे काही टवाळखोर मुले बुलेट व अन्य गाडीला वेगळा सायलेन्सर बसून मोठा आवाज काढणे, बेजाबदारपणे वाहन चालविणे, रस्त्यावर स्टंट करणे असे प्रकार करीत होते. याची दखल घेऊन सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी वाहतूक पोलिस कर्मचारी काळुराम मासळकर, पोलिस मदतनीस जगन्नाथ कांबळे, मुनाफ पिंजारी, आकीब शेख यांचे पथक नेमून कॉलेज रस्त्यादरम्यान मनो पार्कगिंफ मधील गाड्या, ट्रिपल सीट, विनाहेल्मेट, विनालायसन्स अशा 15 गाड्यांवर कारवाई करून सहा हजार रुपयांचा महसूल गोळा केला. या कारवाईदरम्यान अल्पवयीन मुलांना समज देऊन त्यांच्या पालकांना फोन करून सूचना देण्यात आल्या. जर कोणी मुलीची छेड काढत असेल, तर मुलींनी न घाबरता 9766040980 या क्रमांकावर फोन करावा, असे आवाहन शेलार यांनी केले.