धनकवडी: धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि बांधकाम विकास विभागाच्या वतीने भारती विद्यापीठ परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. भारती विद्यापीठामागील परिसर ते त्रिमूर्ती चौक तसेच सातारा रस्त्यावरील राजर्षी शाहू बँक ते गुलाबनगर भागातील अतिक्रमणे या वेळी काढण्यात आली.
रस्ता व पदपथांवरील अतिक्रमणांवर या वेळी कारवाई करण्यात आली तसेच इमारतीच्या फ्रंट व साइड मार्जिनमधील अनधिकृत बांधकामे काढण्यात आली. या कारवाईत एकूण पाच हजार चौरस फुटांचे क्षेत्र मोकळे करण्यात आले तसेच 15 काउंटर, 23 शेडसह विविध साहित्य जप्त करण्यात आले. (Latest Pune News)
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे, सहायक आयुक्त तिमय्या जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अतिक्रमण अधिकारी नारायण साबळे, प्रवीण भावसार, उपअभियंता वंदना गवारी, शाखा अभियंता मोहन चव्हाण, कनिष्ठ अभियंता गणेश ढगे, अतिक्रमण निरीक्षक सागर विभुते, अविनाश धरपाळे, राहुल बोकण, अतुल ब्राह्मणकर, अविनाश बागूल आदींच्या पथकाने जेसीबी, चार ट्रक आणि बिगारींच्या साह्याने ही कारवाई केली.
परिसरातील नागरिकांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.