

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र कौन्सिलकडे नोंदणी नसल्याने लोहगाव परिसरातील होमिओपॅथी डॉक्टरवर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई करण्यात आली. कौन्सिलने केलेल्या तक्रारीनंतर बोगस डॉक्टरविरोधी समितीकडून कागदपत्रांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांनी तक्रार नोंदवली. बोगस डॉक्टरवरील नवीन वर्षातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे. इंडियन कौन्सिल किंवा महाराष्ट्र कौन्सिलकडे डॉक्टरांची नोंदणी नसेल किंवा डॉक्टरने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतली नसल्यास तक्रार प्राप्त झाल्यावर किंवा पाहणीत त्रुटी आढळून आल्यावर कारवाई केली जाते.
बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय, चुकीचे उपचार करणे अशा विविध कारणांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. आतापर्यंत शहरात 47 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधमोहिमेंतर्गत महापालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय, चुकीचे उपचार करणा-या, अधिकृत नोंदणी नसणा-या डॉक्टरांविरोधात नागरिक, संस्था महापालिकेकडे तक्रार करु शकतात. कागदपत्रांची शहानिशा करून तातडीने कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली.
राज्य शासनाच्या आदेशानुसार, बोगस डॉक्टर शोधमोहीम महापालिकेतर्फे 2012 पासून हाती घेण्यात आली आहे. महापालिका आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतात, तर आरोग्यप्रमुख समितीचे सचिव असतात. याशिवाय, पोलिस प्रशासनाचा प्रतिनिधी, अन्न आणि औषध विभागाचा प्रतिनिधी, कायदेशीर प्रतिनिधी, क्षेत्रीय स्तरावरील वैद्यकीय अधिकारी आणि सहायक आरोग्य अधिकारी, सामाजिक संस्थेचा प्रतिनिधी हे समितीचे सदस्य असतात. समितीची बैठक दर दोन – तीन महिन्यांनी घेतली जाते. यामध्ये कामकाजाचा आढावा घेणे, नवीन तक्रारींविषयी चर्चा करणे, कार्यवाही करणे याबाबत बैठकीत चर्चा होते.
कायदेशीर डॉक्टरांकडे स्थानिक मेडिकल काऊन्सिलमध्ये नोंद असणे आवश्यक असते. महाराष्ट मेडिकल काऊन्सिलकडे डॉक्टरांच्या पदवीची नोंद गरजेची असते. इतर राज्यातून पदवी घेतली असली तरी आपण जिथे प्रॅक्टिस करतो तिथे नोंद करणे आणि दर पाच वर्षांनी नोंदीचे नूतनीकरण करणे, हा नियम आहे. क्रॉसपॅथीबद्दलच्या तक्रारी ग्राहक पंचायतीकडे कराव्या लागतात, असेही डॉ. बळीवंत यांनी सांगितले.