

तळेगाव स्टेशन (पुणे ) : तळेगाव दाभाडे स्टेशन भागात तळेगाव वाहतूक विभागाअंतर्गत विशेष मोहीम म्हणून ब्लॅक फिल्मप्रकरणी 86 चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. सलग आठवडाभर छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन चौक, तळेगाव चाकण महामार्ग आदी ठिकाणी चार चाकी गाड्यांवर ब्लॅक फिल्मची कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाईत आजपर्यंत सुमारे 86 चार चाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या गाड्यांचे ब्लॅक फिल्म काढून टाकण्यात आली आहे. तसेच वाहनांवर वर्षानुवर्ष थकीत असलेला दंड भरून घेतला जात आहे. जे वर्षानुवर्ष आपल्या वाहनांवरील दंड भरत नाही, दंड भरण्यास टाळाटाळ करतात त्यांच्यावर यापुढे खटले दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.
धडक कारवाईने चाप
तळेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी विशाल गजरमल, पोलिस उपनिरीक्षक रमेश पोटे आणि स्टाफ यांनी सलग कारवाई केल्यामुळे तळेगाव दाभाडे शहरात ब्लॅक फिल्म कार रस्त्यावर दिसने बंद झाले आहे. तसेच वाहतूक पोलिसांचा रोडवरील वावर वाढल्याने ज्यांचेकडे वाहन चालविण्याचे लायसन नाही, अल्पवयीन वाहन चालक, दुचाकीवर ट्रीपलशीट जाणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे अशा बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण आले आहे.